मुंबई - Uddhav Thackeray on Eknath Shinde ( Marathi News ) त्यांची शिवसेना म्हणजे एसंशी, मी त्यांचे पूर्ण नाव घेत नाही, जसं माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे जे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते, म्हणून ते शॉर्टफॉर्म करतात. त्यामुळे त्यांचे नाव एसंशी आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.
संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी हे विधान केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांना त्यांच्या वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते. त्यांना लाज वाटत असेल तर मी का घेऊ? तुम्ही गद्दारी करून राजकारणातील आईशी हरामखोरपणा केला. महाराष्ट्राशी गद्दारी केली. ही गद्दारी महाराष्ट्रात चालणार नाही असं त्यांनी सांगितले.
तर आत्ताची निवडणूक महाभारतासारखी, त्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं. यंदा लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय. ही लोकशाही वाचवण्यासाठी, स्वातंत्र्य टिकवण्याचं काम आपण केले पाहिजे. लोकशाहीचे धिंडवडे निघतायेत, संविधान पाळलं जात नाही. पक्षांतर केल्यानंतर अपात्रतेची सुनावणी होत नाही. तत्कालीन राज्यपालांनी अधिवेशन बोलावणं कसं चूक होतं, मध्यंतरी लवादाने घेतलेला निर्णय, अद्यापही सर्वोच्च न्यायालयातून निकाल आलेला नाही. तरीही पंतप्रधान माझ्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतायेत, त्यामुळे अप्रत्यक्ष दबाव सर्वोच्च न्यायालयावर आणताय का असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
दरम्यान, मोदी सरकारच्या थापा उघड झाल्या आहेत. हे गजनी सरकार आहे. २०१४ साली ते बोलले, ते २०१९ ला आठवत नाही, २०१९ ला जे बोलले ते आता आठवत नाही. जनतेच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला नाही. जनता २ वेळा मुर्ख बनली आहे आता जनता पेटली आहे. अनेक भूलथापा यांनी दिल्या, भ्रष्टाचारांना घेतायेत, पक्ष फोडले, महाराष्ट्राने गद्दारी कधीच सहन केली नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
महाराष्ट्राचं प्रेम पाहिलं, आता श्राप अनुभवावा
जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, तोपर्यंत राज्यातले उद्योगधंदे पळवण्याची बिशाद नव्हती. आता गद्दारी केल्यानंतर डबल इंजिन सरकार आहे. डबल इंजिन लागल्यानंतर ज्या वेगाने उद्योगधंदे पळवले, आज आपल्या हातात सत्ता नाही. महाराष्ट्रात बेकारी, बेरोजगारी वाढतेय. हा राग आहे. आम्ही तुम्हाला दिले होते, तुम्ही आमचा का घात केला, महाराष्ट्राचा घात का केलात? आज महाराष्ट्रात मोदी गल्लीबोळात फिरतायेत, जरूर फिरावं, महाराष्ट्राचा संताप, आक्रोश अनुभवला पाहिजे. गेली १० वर्ष महाराष्ट्राचे प्रेम, आशीर्वाद मिळाले आणि महाराष्ट्राचा श्राप काय असतो तो मोदींनी अनुभवावा असंही ठाकरेंनी मुलाखतीत म्हटलं.
शिवसेनेचा नव्हे तर महाराष्ट्राचा घात केला
माझ्या छातीवर मशाल, पण जनतेच्या हृदयात मशाल पेटली आहे. २०१४ आणि २०१९ ला नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी पोहचले त्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता. ४० पेक्षा अधिक खासदार महाराष्ट्राने दिले. महाराष्ट्राने इतके भरभरून दिल्यानंतरही तुम्ही केवळ शिवसेनेचा घात केला नाही तर महाराष्ट्राचा घात केला. शिवसेना ही मराठी अस्मिता जपणारी आणि हिंदुत्वाचा जागर करणारी आहे. महाराष्ट्राचा घात एवढ्यासाठी की, राज्यातले अनेक उद्योगधंदे गुजरातला नेले, मुंबईतले अनेक उद्योग गुजरातला पळवले असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.