Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. शिवसेनेला पडलेले भगदाड सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. यातच शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र शिवसैनिकांकडून लिहून घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, या मोहिमेला सुरुंग लागल्याचे दिसत आहे. कारण बाँडवर शपथपत्र करून देणारे पदाधिकारी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते सकाळी एकीकडे तर सायंकाळी दुसऱ्या गटात पाहायला मिळत आहे. अशात शिवसेनेच्यावतीने स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून बाँड शपथपत्र लिहून घेतले जात आहे. आता शपथपत्र करून देणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला जात असल्याचे समोर आले आहे. स्थानिक नेतृत्वावर आम्ही नाराज असल्याचे कारण देत शिवसेनेला सोडचिठ्ठी देत आमदार संजय शिरसाट यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
अचानक शिंदे गटात सामील झाले
शिवसेनेत झालेल्या बंडानंतर अनेक शिवसैनिकांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याची घोषणा केली होती. तर काहींनी आपली निष्ठा दाखवण्यासाठी चक्क बाँडवर शपथपत्र करून दिली होती. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेचे उपशहर प्रमुख अनिल मुळे यांनी सुद्धा असेच शपथपत्र बाँडवर लिहून दिले होते. सोबतच आपण शिवसेनेसोबतच असणार असल्याचे लिहून दिले होते. मात्र आता अचानक ते शिंदे गटात सामील झाले आहे.
दरम्यान, शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता टोकाला गेले असून, वरच्या पातळीवर सुरु असलेला संघर्ष आता स्थनिक पातळीवर येऊन पोहचला आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची कोणतेही संधी दोन्ही गटातील नेते सोडत नाही. त्यातच दोन्ही गटांकडून मेळाव्याला मेळाव्यातून उत्तर दिले जात असल्याचे चित्र औरंगाबाद शहरात पाहायला मिळत आहे. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शिवाजीनगरमध्ये मेळावा घेतल्यानंतर लगचेच शिंदे गटाचे राजेंद्र जंजाळ यांनी मेळावा घेतला.