बुलढाणा - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागले. त्यात आता खरी शिवसेना आमचीच असा दावा उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे या दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. दोन्ही गटाने आपापले पदाधिकारी नेमण्यास सुरूवात केली आहे. त्यात बुलढाण्यात शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यामुळे तुफान राडा झाला.
नेमकं काय घडलं?एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडात शिवसेनेचे ४० आमदार सहभागी झाल्याने त्यामुळे पक्षात मोठी फूट पडली आहे. पक्षातील ही फूट भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून जिल्ह्यात नव्या पदाधिकारी नेमणुका सुरू आहेत. बुलढाण्यातही उद्धव ठाकरेंकडून नवीन पदाधिकारी नेमले. याच पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ उद्धव ठाकरे गटाकडून आयोजित करण्यात आला होता. परंतु आम्हीच शिवसेना असा दावा करत आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी सत्कार कार्यक्रमात राडा घातला.
यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात अचानक प्रवेश करत गोंधळ घातला. ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. काही पदाधिकाऱ्यांना यात मारहाण झाली. हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या उपस्थित घडला. पोलिसांनी या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्ते एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत होते.
ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात ठेवण्यात आला होता. त्याठिकाणी अचानक शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हीच शिवसेना आहोत अशी घोषणाबाजी करत प्रवेश केला. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी खुर्च्याची तोडफोड करण्यात आली. तेव्हा दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली परंतु कार्यकर्ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करून कार्यकर्त्यांना हटवावं लागलं.
खरी शिवसेना कुणाची? बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली दिली असा आरोप शिंदे गटाकडून वारंवार करण्यात येतो. त्यात आम्ही शिवसेना आहोत. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून केला जात आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही दोन्ही गटाने अर्ज केला आहे. अद्याप यावर कुठलाही निर्णय झाला नाही. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.