Ajit Pawar News : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून राजकीय वाद निर्माण झाला. विरोधकांनी सत्ताधारी महायुतीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या विधानाबद्दल आज अजित पवारांनी बुलढाण्यातील कार्यक्रमात खडेबोल सुनावले. वाचाळवीर म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर संजय गायकवाड यांचे नाव न घेता कान टोचले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अंजित पवार यांच्या उपस्थितीत माझी लाडकी बहीण कार्यक्रम बुलढाण्यात गुरुवारी (१९ सप्टेंबर) पार पडला. या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड यांचीही उपस्थिती होती.
अजित पवार काय बोलले?
आमदार संजय गायकवाड यांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले, "मी एक गोष्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेन. प्रत्येकाला आपापली मते आणि विचार मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. पण, कुठलाही सत्ताधारी किंवा विरोधी असेल, वाचाळवीरांनी आपापल्या मर्यादा पाळाव्यात."
"आपण शिव-शाहूंच्या महाराष्ट्रात राहतो. कुठेही वेडेवाकडे विधान करून कुठेही मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या घटक पक्षांना अडचणीत आणू नका. ठीक आहे, राग येतो. आम्हालाही येतो. पण, राग व्यक्त करताना काही मर्यादा असतात. त्यासंदर्भात कुठली भाषा वापरली जाते?", अशा शब्दात अजित पवारांनी फटकारले.
राहुल गांधींवर अजित पवारांची टीका
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबद्दल केलेल्या विधानावर अजित पवार म्हणाले, "घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी या गरीब वर्गाला, आदिवासी, आणि माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या बरोबर आणण्यासाठी आरक्षण दिले. ते आरक्षण काढून घेण्याची भाषा तु्म्ही करता. ही देशातील पद्धत आहे का?", असा सवाल त्यांनी केला.