पावसाची जशी चातक पक्षाला आतुरता, ओढ असते तशी पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्याची ओढ गेले वर्षभर वारकरी ठेवून आहे. पाऊस पडला नसला तरी शेतकरी वारीची तयारी करत आहेत. २९ जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यंदा नेहमीपेक्षा जास्त वारकरी वारीत सहभागी होतील असा अंदाज आयोजकांना आहे. विधानसभा डोळ्यासमोर असल्याने शरद पवार हे वारीत सहभागी होणार असल्याचे वृत्त होते. अशातच राहुल गांधी देखील वारीत सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
प्रथा - परंपरेनुसार रविवार दि. २९ जूनला सायंकाळी साडेचारच्या सुमारास वाजत - गाजत माउलींच्या पालखीचे समाधी मंदिरातून प्रस्थान होईल. त्याचदिवशी दर्शनबारी मंडपात (आजोळी) माउलींचा पहिला मुक्काम असणार आहे. ३० जून व १ जुलैला पालखी सोहळा पुण्यनगरीत मुक्कामी राहील. दि २ व ३ जुलैला सासवड, त्यानंतर ४ जुलैला जेजुरी, ५ जुलैला वाल्हे, त्यानंतर नीरा स्नाननंतर ६ जुलैपर्यंत पालखी सोहळा लोणंद येथे मुक्कामी जाईल. त्यांनतर ८ जुलैला तरडगाव, ९ जुलैला फलटण, १० जुलैला बरड, ११ जुलैला नातेपुते, १२ जुलैला माळशिरस, १३ जुलैला वेळापूर मुक्कामी असणार आहे. १६ जुलैला पालखी सोहळा पंढरीत पोहचणार असून मुख्य आषाढी एकादशी सोहळा १७ जुलै आहे.
या दरम्यान राहुल गांधी आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रयत्न करत आहे. विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण आहे. शेतकऱ्यांनी महागाई, केंद्र आणि राज्य सरकारांची धोऱणे आणि सध्याची राजकीय परिस्थिती यामुळे लोकसभेला महायुतीला दणका दिला होता. हेच वातावरण कायम ठेवण्यासाठी काँग्रेस राहुल गांधी यांना वारीत आणण्याचा विचार करत आहे.
पुण्यात वारी दोन दिवस मुक्कामी असणार आहे. नंतर पुढे ती सासवड, लोणंद, फलटणमार्गे पंधरपूरला जाणार आहे. या वारीत राहुल गांधी देखील चालताना दिसणार आहेत, असे काँग्रेसच्या सुत्रांनी सांगितले. भारत जोडो यात्रा व न्याय यात्रेत राहुल गांधी यांनी पायपीट केली होती. यामुळे वारीतही राहुल गांधी यांना आणल्यास त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार असल्याचा होरा विरोधकांचा आहे.