"आधी आर्थिक सक्षम हो, मग तुझा विचार करू..."; राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 07:32 PM2023-06-15T19:32:41+5:302023-06-15T19:33:24+5:30
शहराध्यक्ष म्हणून मी अजित पवार यांचं स्वागत करतो. परंतु पक्ष हा पडत्या काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आणि अल्पसंख्याकांचा पक्ष राहिलेला नाही याची खंत वाटते असं एकनाथ भावसार यांनी म्हटलं.
धुळे - जिल्ह्यातील शिंदखेडा दोंडाईचा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहणार होते, मात्र मेळावा सुरू होण्यापूर्वीच सभास्थळी लागलेल्या एका बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
राष्ट्रवादीचे दोंडाईचा प्रभारी शहराध्यक्ष ॲड. एकनाथ भावसार यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करीत जाहीर बॅनरबाजी केली. एकनाथ भावसार यांनी अजित पवारांच्या सभेच्या ठिकाणी एक वादग्रस्त बॅनर लावले होते. आणि त्यात लिहिले होते की, पक्षाच्या पडत्या काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर ही वेळ यायला नको, अजून जिल्ह्याच्या नियुक्ती झालेल्या नाहीत, फक्त निष्ठेवर निवडणुका जिंकून येत नाही, आधी आर्थिक सक्षम हो, मग तुझा विचार करू, असा मजकूर असलेले बॅनरने सभेसाठी येणाऱ्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना एकनाथ भावसार म्हणाले की, शहराध्यक्ष म्हणून मी अजित पवार यांचं स्वागत करतो. परंतु पक्ष हा पडत्या काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आणि अल्पसंख्याकांचा पक्ष राहिलेला नाही याची खंत वाटते. आज राष्ट्रवादीच्या मेळाव्यात स्टेजवर जे बसणार आहेत, ते सर्वजण २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत होते. २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे नेते हेमंत देशमुख यांनी ५ हजार मते पक्षाच्या उमेदवाराला मिळवून दिली होती. मात्र २०१९ मध्ये मी पक्षाचा शहराध्यक्ष या नात्याने पक्षातील उमेदवाराला १२ हजार मते दोंडाईचा-शिंदखेडा तालुक्यातील मिळवून दिली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यातील पत्रिकेवरही आपले फोटो आणि नाव ही नाही. या कार्यक्रमामध्ये मला बोलावण्यात आलेलं नाही. अत्यंत मला मनाला वेदना देणारे चित्र निर्माण झालेले आहे. पक्ष नेत्यांना ही कृती करण्यापूर्वी मी संपूर्ण सूचना आणि कल्पना दिलेली आहे. परंतु त्यांनी कुठली दखल घेतलेली नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच राहणार. पक्षात राहूनच या सगळ्या बेईमानांना धडा शिकवण्याचा कामगिरी निश्चितच करेन असंही भावसार यांनी सांगितले.
दरम्यान, डॉ. हेमंत देशमुख हे दोंडाईचा शहराचे नेते नाहीत याठिकाणी ७० टक्के ओबीसी समाज असलेल्या दोंडाईचा शहरात ओबीसींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. त्याच्यामुळे पक्षाला मत मिळतात. दोंडाईचा शहरांमध्ये डॉ. हेमंत देशमुख यांचे नातेवाईक आहेत म्हणून या ठिकाणी ते येतात. माझ्या कामांमध्ये हस्तक्षेप करतात आणि मला पक्षापासून कसे दूर करता येईल, याचे षडयंत्र हे डॉ. हेमंत देशमुख आणि जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे करीत आहेत असा आरोपही एकनाथ भावसार यांनी केला.