बुलढाणा - विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यातलं राजकीय गणित बिघडलं. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ५० आमदारांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी आता पक्षातील असंतोषाला वाचा फोडण्यास सुरूवात केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाजूची चौकडीमुळे ही वेळ आल्याचं शिंदे गटातील नाराज आमदार सांगत आहेत.
त्यातच आता शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. मातोश्री निवासस्थानी केवळ बैठक असेल तरच प्रवेश दिला जात होता. इतर वेळी आम्हाला भेटीसाठी वेळ मागूनही मिळत नव्हता. एकदा तर मी माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे वेळ मागितली. परंतु तीदेखील मिळाली नाही. मला उद्धव ठाकरेंसमोरच त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी धक्का मारत मागे ढकललं. तेव्हाही उद्धव ठाकरे थांब, हा माझा शिवसैनिक आमदार आहे असा शब्द आला नाही हे आम्ही भोगलंय असा दावा गायकवाड यांनी केला आहे.
महाराष्ट्रात आता भाजपा-शिंदे गटाचं सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आहे. तर उपमुख्यमंत्रिपदाची माळ देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पडली आहे. मागील १५ दिवसांपासून सुरू असलेलं सत्तानाट्य आता संपुष्टात आले असले तरी शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आणखी वाढत जात असल्याचं समोर येत आहे. यात शिंदे गटाचे आमदार थेट शिवसेनेच्या नेत्यांवर हल्ला करत आहेत.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांवर अनेकांनी सत्तेसाठी हापापलेत असा आरोप आमच्यासह केला. मात्र मोठे मन दाखवून फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना दिले. पक्षाचे आदेश आल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असं कौतुक आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. त्याचसोबत आता मंत्री कुणाला करायचं? याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असंही गायकवाड यांनी केला आहे.