पुण्यामधील कल्याणीनगर येथे एका बड्या उद्योगपतीच्या ‘बाळा’ने मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवून दोन जणांच्या घेतलेल्या बळीचं प्रकरण आता आता चांगलंच तापलं आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपीच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी बदलल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या डॉक्टरांवर अटकेची कारवाई झाल्यानंतर सदर डॉक्टराची नियुक्ती ही आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारशीवरून झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सत्ताधारी महायुती सरकार गंभीर आरोप केले आहेत.
या प्रकरणी केलेल्या ट्विटमध्ये विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होता हे समोर येत आहे. ज्या डॉक्टरांनी या प्रकरणात रक्ताचे नमुने बदलले त्याला ससून रुग्णालयात अधीक्षक पदाची जबाबदारी द्यावी असे शिफारस पत्र अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी पत्र लिहून मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी केली होती. भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिफारस पत्र लिहून पदावर बसवण्यात येत आहे. राजकीय पाठबळ असल्यामुळेच नियम आणि कायदे धाब्यावर बसवून निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या आरोपींना वाचवण्याइतकी ह्या अधिकाऱ्यांची हिंमत होत आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
दरम्यान, कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणातील आरोपी ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने बदण्याचा आरोप असलेले डॉ. अजय तावरे यांच्याकडे ससूनच्या अतिरिक्त अधीक्षकपदी नियुक्ती करण्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ यांच्याकडे केली होती, याबाबतचे पत्र आज समोर आले होते. तसेच मुश्रिफ यांनी ही शिफारस मान्य करण्याचा अभिप्राय या पत्रावर दिला होता. त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.