महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रवास करत असताना एका मुस्लिम महिलेने धावत्या ट्रेनमध्ये मुलीला जन्म दिला. कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसने ६ जून रोजी लोणावळा स्थानक ओलांडताच मीरा रोड येथील फातिमा खातून ही ३१ वर्षीय महिला आई झाली. तिचे पती तय्यब यांनी बाळाचे नाव रेल्वे गाडीच्या नावावरून ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानुसार त्यांच्या लेकीचे नाव महालक्ष्मी असे ठेवण्यात आले. तिरुपती ते कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरापर्यंत प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी सांगितले की, या रेल्वे गाडीत मुलीचा जन्म होणे म्हणजे आमच्यासाठी देवीचे दर्शन घेण्यासारखे होते.
प्रवाशांनी सांगितलेल्या गोष्टी कानावर पडताच मुलीचे नाव महालक्ष्मी ठेवण्याचा निर्णय घेतला असे चिमुकलीचे वडील तय्यब सांगतात. तय्यब आणि त्यांची पत्नी या जोडप्याला आधीच तीन मुलगे आहेत. फातिमाच्या प्रसूतीची शेवटची तारीख २० जून असल्याने, कुटुंबीयांनी ६ जून रोजी कोल्हापूर ते मुंबई रेल्वे प्रवास करण्याचे ठरवले. तय्यब म्हणाले की, प्रवासात गाडीचे इंजिन बिघडल्याने लोणावळ्यात दोन तासांहून अधिक वेळ ट्रेन थांबली होती. रात्री ११ च्या सुमारास पुन्हा प्रवास सुरू झाल्यावर, माझ्या पत्नीने पोटदुखीची तक्रार केली. मग ती बराच वेळ शौचालयातून परत न आल्याने मी गेलो असता तिने बाळाला जन्म दिल्याचे पाहिले. तेथील काही महिला प्रवाशांनी आमची मदत केली.
दरम्यान, ट्रेनमधील एका जीआरपी कॉन्स्टेबलने तय्यब यांना जीआरपी हेल्पलाइनवर कॉल करून घटनेची माहिती देण्याचा सल्ला दिला. मग गाडी कर्जत स्थानकात आल्यावर कुटुंबीय उतरले. कर्जत जीआरपीचे सहायक पोलीस निरीक्षक मुकेश ढंगे म्हणाले, "आम्ही कर्जत उपजिल्हा इस्पितळाला माहिती दिली आणि परिचारिका शिवांगी साळुंके आणि इतर कर्मचारी स्टेशनवर पोहोचले. महिला आणि बाळाला पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले." मग तीन दिवसांच्या उपचारानंतर आई आणि बाळाला घरी सोडण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.