मुंबई – येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा नव्या चेहऱ्यांना संधी देणार असून सुमार कामगिरी केलेल्या विद्यमान खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा मंगळवारी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी गणेश दर्शनासोबतच पक्षातील नेत्यांसमावेत बैठक घेत राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तयारीला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून नड्डांसोबत ही बैठक झाली.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यानंतर जे.पी नड्डा मुंबईत पोहचले होते. यावेळी त्यांनी भाजपा नेत्यांसोबत निवडणुकीचा आढावा घेतला. पुढच्या लोकसभेला भाजपा अनेक धक्कातंत्र वापरणार असल्याचे कळते. त्यात विद्यमान खासदारांच्या काही जागांवर नवीन चेहऱ्यांची चाचपणी केली जात आहे. राज्यातील काही खासदारांच्या कामावर केंद्रीय नेतृत्वाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या खासदारांना निरोप देऊन त्यांच्याऐवजी पक्षातील नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. सध्या कोणत्या खासदारांचे तिकीट कापणार हे निश्चित सांगितले नसले तरी या बातमीने विद्यमान खासदारांची चिंता वाढली आहे.
विशेषत: मुंबईत भाजपाच्या काही जागांवर बदल होण्याची शक्यता आहे. भाजपाने खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार केले आहे. त्या कार्डनुसार कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाही हे ठरवण्यात येईल. भाजपाच्या वतीने राज्यात लोकसभा ४५ प्लस जागांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. मिशन ४५ साठी भाजपा अथक प्रयत्न करत आहे. भाजपाने अंतर्गत केलेल्या सर्व्हेत काही खासदारांच्या कामगिरीबद्दल नकारात्मक अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे या खासदारांचे तिकीट कापून त्यांच्याऐवजी नवीन नेते निवडणुकीला उभे करण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला कोणताही धोका पत्करायचा नाही. ज्या खासदारांची कामगिरी सुमार आहे, त्याचसोबत मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजी आहे अशांना तिकीट देऊन नुकसान करण्याची तयारी भाजपाची नाही. त्यामुळे या खासदारांना घरी बसवून नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते यासाठी भाजपाची चाचपणी सुरू आहे.