Maharashtra Politics: एकीकडे सन २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक आणि दुसरीकडे राज्यातील आगामी महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, राजकीय वर्तुळाचे लक्ष याच निवडणुकीकडे लागले आहे. मात्र, यातच भाजप १० लाख समर्थकांचा पाठिंबा गमवणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
आगामी काळात महाराष्ट्रात भाजपसमोर अनेक निवडणुका उभ्या ठाकल्या आहेत. महाविकास आघाडीसह अन्य विरोधी पक्षांचे आव्हानही भाजपसमोर आहे. यातच तळागाळातील समाजापर्यंत संघटना मजबूत करण्यावर भाजपचा भर राहिलेला असातानाच ऐन मोक्याच्या वेळेस भाजपशी संलग्न असलेल्या एका आघाडीने साथ सोडण्याचा इशारा दिला आहे. या आघाडीने भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्यास १० लाख लोकांचा पाठिंबा भाजप एकाच फटक्यात गमावेल, अशी मोठी भीती व्यक्त करण्यात आली आहे. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना यासंदर्भात एक निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत, पण...
राज्यातील १० लाख लोकांचा पाठिंबा भाजप गमावणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील माजी सैनिक भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत असतांनाही सैनिकांच्या प्रश्नांकडे भाजपने दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी सैनिक आघाडीने केला आहे. भाजपाशी संलग्न असणारी माजी सैनिक आघाडी पक्षातून बाहेर पडली तर मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण यात १० लाख आजी-माजी सैनिकांचा समावेश असून त्यांच्या कुटुंबियांद्वारेही भाजपाला डावलले जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी आमचा परिवार खंबीरपणे उभा आहे. पण कोणतेही प्रश्न सुटलेले नाही. त्यामुळे भाजपमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची माहिती भाजप माजी सैनिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नारायण अंकुशे यांनी दिली.
दरम्यान, या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत भाजप प्रदेश कार्यालयात माजी सैनिकांची महत्वपूर्ण बैठक पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीनंतर भाजप माजी सैनिक आघाडी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.