नागपूर/मुंबई : राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट आली असून, शुक्रवारचा दिवस विदर्भातील नागरिकांची परीक्षा पाहणारा ठरला. विदर्भातील सात शहरांमध्ये पारा ४५ अंशांच्या वर गेला असून, चंद्रपुरात सर्वाधित ४६.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. शनिवारीही विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’ असून, तापमानात आणखी वाढू शकते. मुंबईत तडाखा कायम आहे. तापमान ३८ अंशांवर पाेहाेचले आहे. गडचिरोली वगळता इतर सर्वच ठिकाणी मागील २४ तासांत पाऱ्यात ०.३ ते ०.९ अंश सेल्सिअसने वाढ झाली. अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा व यवतमाळ येथे तापमान ४५ अंशांहून अधिक होते.
दिल्लीत ७२ वर्षांतील दुसरा सर्वात उष्ण एप्रिलदेशातील अनेक राज्यात काही आठवड्यांपासून आलेली उष्णतेची लाट या आठवड्याच्या अखेरीस आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये मागील ७२ वर्षांतील दुसरा सर्वात उष्ण एप्रिल महिना म्हणून चालू महिन्याची नोंद झाली आहे. दिल्ली परिसरात शुक्रवारी ४६ अंश सेल्सिअस तापमान होते. उष्णतेच्या लाटेमुळे हवामान खात्याने राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिसा या राज्यांना गुरुवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भातही उन्हाळा आणखी कडक झाला. देशाच्या मध्य व उत्तर - पश्चिम भागात आगामी पाच दिवस उष्णतेच्या लाटेची तीव्रता कायम राहील. हरियाणा, पंजाब, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान या ठिकाणी उद्या धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे.