नाशिक - नांदगाव मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र याच मतदारसंघात छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांनी कांदेसमोर आव्हान निर्माण केले आहे. समीर भुजबळ या मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यातच नांदगाव मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे. या मतदारसंघात सुहास कांदे यांच्याविरोधात त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेले सुहास कांदे यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे कांदेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
समीर भुजबळांनीच नावात साधर्म्य असणारा उमेदवार रिंगणात उतरवला असल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. नांदगाव मतदारसंघात आज मोठा तणाव पाहायला मिळाला. कांदे समर्थकांनी समीर भुजबळांच्या गाड्या अडवल्याचा प्रकार घडला. नांदगाव मतदारसंघात सुहास कांदे हे महायुतीचे उमेदवार आहेत. मात्र त्यांच्या नावासारखेच दुसरे सुहास कांदे निवडणुकीला उभे राहिलेत. त्यामुळे सुहास कांदे विरुद्ध सुहास कांदे लढाईने महायुतीच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली आहे.
विशेष म्हणजे नांदगाव मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवणारे समीर भुजबळ यांनीच सुहास कांदे यांना निवडणूक कार्यालयात नेले. त्याठिकाणी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर त्यांच्या वाहनातूनच सुहास कांदे पुढे गेले. या प्रकारावेळी तहसिल कार्यालयाला पोलीस छावणीचे रुप आले होते. पोलीस बंदोबस्तात समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांना वाहनात बसवण्यात आले. दुपारी सुहास कांदे नावाचा तरुण निवडणूक उभं राहणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार सुहास कांदे यांचे समर्थक निवडणूक कार्यालयाजवळ जमले होते. तेव्हा भुजबळ यांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न कांदे समर्थकांकडून करण्यात आला. त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
कांदे आणि भुजबळ आमनेसामने
नांदगाव मतदारसंघात यंदा सुहास कांदेविरोधात समीर भुजबळांनी आव्हान निर्माण केले आहे. सुहास कांदे दहशत निर्माण करत असल्याचा आरोप लोकशाही धडक मोर्चाचे पदाधिकारी शेखर पगार यांनी समीर भुजबळांच्या व्यासपीठावर केला. सभेत माईकवरूनच सुहास कांदे यांची ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली. त्यात अजित पवार गटाचे समन्वयक विनोद शेलार यांच्यावर सुहास कांदे संतापल्याचे दिसून आले. मात्र व्हायरल ऑडिओ क्लिप, व्हिडिओ फेक असून मी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचं सांगत आमदार सुहास कांदे यांनी हे आरोप फेटाळले.