राजकारणात कोणी कायमचा शत्रू-मित्र नसतो! अजित पवार बोलून गेले, दुसऱ्याच क्षणी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 07:58 AM2022-03-26T07:58:10+5:302022-03-26T08:03:20+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान अन् सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
मुंबई : राजकारणात कोणी कायमचे शत्रू वा मित्र नसते, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आणि पत्रकारांच्या भुवया उंचावल्या. मात्र, आपल्या या विधानाचा वेगळा काही अर्थ काढू नका, असे पवार यांनी स्वत:च स्पष्ट केले.
विधिमंडळ अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर ते पत्रपरिषदेत बोलत होते. त्यानी ईडी वापरली तर तुम्ही पोलीस वापरायचे हे योग्य वाटते काय, या प्रश्नावर पवार म्हणाले की, कोणतेही सरकार लोकशाही पद्धतीने निवडून आलेले असते. सत्तापक्ष आणि विरोधक दोघांनी एकमेकांचा सन्मान ठेवला पाहिजे. कोणी कोणाचे कायमचे शत्रू वा मित्र नसतो असे सांगताना त्यांनी, १९९५ पासून राज्यात बदलत गेलेल्या राजकीय जोड्यांचा संदर्भ दिला.
नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली. सूडभावनेने अशा कारवाया करण्याची राज्याची परंपरा नाही. हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे, असेही ते म्हणाले.
विधानसभाध्यक्ष निवड राज्यपालांच्या अनुमतीनेच
विधानसभा अध्यक्षांची निवड या अधिवेशनातही होवू शकली नाही. पुढील अधिवेशनात तरी ती होणार का, या प्रश्नात त्यांनी राज्यपालांच्या अनुमतीशिवाय ही निवड केली जाणार नाही, असे स्पष्ट केले. या परवानगीशिवाय निवड करायची असा विचार आमच्यात झाला होता पण शेवटी राज्यपालांच्या परवानगीशिवाय निवड करायची नाही, असे ठरल्याचे अजित पवार म्हणाले.