लासूर स्टेशन : लासूर स्टेशन गावात पशुचिकित्सालय नसल्याने आजारी पडलेल्या जनावरांवर उपचार करण्यासाठी पशुपालकांना लांबचा पल्ला गाठावा लागत आहे. तर वेळेत उपचार न मिळाल्याने जनावरांच्या मृत्यूचा धोका वाढला. परिणामी अनेक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात लासूर स्टेशन येथील बाजारपेठ नावारुपास आलेली आहे. लासूर पंचक्रोशीतील सुमारे तीस गावांतील व अन्य तालुक्यासह जिल्ह्यातील लोक या ठिकाणी खरेदीसाठी येतात. लासूरचे प्राथमिक आरोग्य केंद्र देखील रुग्णांसाठी उपयुक्त आहे; परंतु या भागातील पशुपालकांना जनावरांच्या उपचारासाठी थेट औरंगाबाद किंवा वैजापूर, गंगापूर गाठावे लागते. पशुपालकांच्या दृष्टीने दळणवळणास सोयीचे असलेल्या लासूर स्टेशन येथे पशुचिकित्सालय सुरू करण्याची गरज आहे.
जनावर आजारी पडल्यास त्याच्यावर उपचार करण्यासाठी पशुचिकित्सक अधिकारी येत नाही. खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या जनावरांच्या डॉक्टरांवर कारवाई होत असल्याने तेही उपचार देण्यास टाळाटाळ करतात. परिणामी पशुपालकांना चारचाकी वाहनात जनावरांना टाकून उपचारासाठी न्यावे लागते. त्यामुळे अधिकचा खर्च लागत आहे. तर वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेक जनावरांचा मृत्यू देखील होऊ लागला आहे. त्यामुळे लासूर स्टेशन येथे पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
लासूर स्टेशन-डोणगाव सर्कलमधील २३ गावातील जनावरांची संख्या :
बैल-गाय - ६७०९
म्हैस - ५६८
शेळ्या - ४३३२
मेंढ्या - १७२५
पशुवैद्यकीय दवाखान्याचा ठराव घेतलेला आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा सुरू आहे. जोपर्यंत काम मार्गी लागत नाही. तोपर्यंत सातत्याने मागोवा घेतला जाईल. - मीना संजय पांडव, सरपंच, लासूर स्टेशन.