बारामती - Amol Kolhe on Ajit Pawar ( Marathi News ) शेतकरी आक्रोश मोर्चा निघाल्यापासून महाराष्ट्र सरकारमधले अनेक मंत्री घाईघाईनं टीका का करायला लागले? इतिहासात झोकावून पाहिले तर स्वराज्य काळात वतनदार आपली वतनं वाचवण्यासाठी कधी निजामशाही, कधी आदिलशाही, कधी मुघलशाहीकडे जात होती. रयतेच्या कल्याणाचे देणंघेणं कुणालाही नव्हतं. आज शेतकऱ्यांचे प्रश्न समोर येतायेत. महाराष्ट्राचे प्रश्न समोर येतायेत. राज्याचा स्वाभिमान डिवचला जातोय पण काही मी मी म्हणणाऱ्या नेत्यांना दिल्लीश्वराच्या नजरेला नजर भिडवून माझ्या महाराष्ट्राचे नुकसान का करताय हे विचारण्याचे धाडस नाही कारण वतन वाचवायचे आहे अशी परिस्थिती नाही ना...अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला.
बारामती इथं शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सभेला कोल्हे संबोधित करत होते. त्यावेळी ते म्हणाले की, वाघ आपल्याला लय आवडतो. पण वाघ जेव्हा जंगलात फिरत असतो तेव्हा तो आपल्याला जंगलाचा राजा वाटतो. पण सर्कशीत रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर वाघ कसरती करत असतो तेव्हा काळजाला वेदना होतात. कारण ज्या वाघावर मी जीवापाड प्रेम केले त्याला आज रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर चालावं लागतं. जेव्हा हाच वाघ पिंजऱ्यात उभं राहिलेला बघतो तेव्हा आणखी काळजाला वेदना होतात. कारण या वाघाच्या डरकाळीनं भल्याभल्यांचा थरकाप उडत होता. आज त्याला पिंजऱ्याच्या आडून गुरगुरावं लागतं. कुणीही येणारे जाणारे त्याला दगड मारू शकते ही भावना जेव्हा वाघाची होते. असेच महाराष्ट्राच्या हितासाठी वाघाची डरकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाहीत तेव्हा ही भावना नक्कीच जागी होती असं त्यांनी अजित पवारांचे नाव न घेता टोला लगावला.
तसेच मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही. कारण पुन्हा येईन म्हटलं की अडीच वर्षांनी येता येतंय. अडीच वर्षाने आल्यानंतर तेदेखील अर्धच येता येते. आणि काही दिवसांनी अर्ध्याच्याही अर्ध होतंय. त्यामुळे मी पुन्हा येईन म्हणणार नाही. बारामतीत आज माझे स्वागत केले त्याबद्दल मी मनापासून ऋणी आहे. सुप्रिया सुळेंना संसदेत वावरताना बघतो तेव्हा मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व याचा महाराष्ट्राचा वारसा आणि वसा समर्थ हातात आहे याची खात्री पटते. मधल्या काळात ज्या घडामोडी झाल्या त्यात २ पर्याय होते. एक दडपशाहीसमोर गुडघे टेकण्याचा होता, गुडघे टेकले असते तर नक्कीच फायदा झाला असतो. स्वार्थ साधला गेला असता. पण दुसरा पर्याय होता गुडघे टेकायचे नाहीत तर ताठ मानेने संघर्ष करायचा. संघर्षाची वाट असते तेव्हा नजरेला नजर भिडवून स्वाभिमानाने त्याला सवाल विचारता येतो. हा सवाल विचारण्याचा मार्ग सुप्रिया सुळे आणि मी निवडला आहे असं अमोल कोल्हे यांनी सांगितले.
दरम्यान, शरद पवारांची एक ताकद शक्ती पाठीमागे उभी आहे. ज्या मातीने संपूर्ण देशाला भूषण वाटावा असं रत्न दिला. त्या बारामतीच्या मातीसमोर मी नतमस्तक होतो आणि उरलेले पुण्याच्या सभेत दिलखुलास बोलेन. शेतकऱ्यांचा हा आक्रोश ऐकण्यासाठी पुण्यातील सभेला तुम्ही उपस्थित राहावे असं आवाहन कोल्हे यांनी उपस्थितांना केले.