बदलापूर अत्याचार प्रकरणी काँग्रेस आक्रमक, मंत्रालयावर धडक मोर्चा काढत सरकारला घेरले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 04:29 PM2024-08-21T16:29:31+5:302024-08-21T16:30:06+5:30

Congress Protests News: बदलापूरमध्ये घडलेल्या या घटनेविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच या अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने मंत्रालयावर धडक मोर्चा काढला.

In the case of Badlapur atrocities, Congress was aggressive and surrounded the government by marching on the Mantralaya | बदलापूर अत्याचार प्रकरणी काँग्रेस आक्रमक, मंत्रालयावर धडक मोर्चा काढत सरकारला घेरले

बदलापूर अत्याचार प्रकरणी काँग्रेस आक्रमक, मंत्रालयावर धडक मोर्चा काढत सरकारला घेरले

मुंबई - बदलापूर येथील एका प्रख्यात शाळेत शिकत असलेल्या ४ वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध होत आहे, तसेच या प्रकरणी आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, बदलापूरमध्ये घडलेल्या या घटनेविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच या अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने मंत्रालयावर धडक मोर्चा काढला.

मंत्रालयाच्या दिशेने जाणारा मोर्चा पोलिसांनी अडविल्यानंतर  महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलनकर्त्या काँग्रेसच्या नेत्यांनी महायुती सरकार विरोधात  जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी  विरोधी पक्षनेते  विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, आमदार अस्लम शेख, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, महायुती सरकार एसआयटी सरकार आहे. कोणतीही घटना झाली की लगेच एसआयटीची घोषणा सरकारकडून केली जाते. परंतु कारवाई केली जात नाही. महायुतीची एसआयटी म्हणजे कारवाईचा फार्स आहे. अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र डागले आहे. त्याचबरोबर बदलापूर प्रकरणात एसआयटी नेमली तरी न्याय मिळेल का? असा संतप्त करत या प्रकरणी सरकारने उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केल्याने या नियुक्तीवर  विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला आहे.

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, बदलापूर येथील शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे. त्याच पक्षाच्या सबंधित वकिलाची विशेष वकील म्हणून नेमणूक केली आहे. या वकिलाने निवडणूक लढविली आहे. उद्या हे प्रकरण दाबले गेले  तर त्याला जबाबदार कोण? याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल. सरकार म्हणते विरोधक राजकारण करत आहेत. तुम्हाला लाज वाटत नाही का सरकार म्हणून? कलकत्ता इथे अत्याचाराच्या घटना झाल्यावर भाजप आंदोलन करते तेव्हा राजकारण नसते का? आम्ही  आंदोलन केले की राजकारण होते का? असे खडे बोल श्री. वडेट्टीवार यांनी सुनावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा घटना घडत  आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ५७% टक्के गुन्ह्यात वाढ झाली आहे.पण मुख्यमंत्र्यांचे त्याकडे लक्ष नसल्याचे स्पष्ट करत विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: In the case of Badlapur atrocities, Congress was aggressive and surrounded the government by marching on the Mantralaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.