सुनील चावके, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात महाराष्ट्राला झुकते माप दिले आहे. राज्यातून एकूण आठ सदस्यांचा समावेश झाला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे आणि यशोमती ठाकूर या चार नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
मुख्य कार्यकारिणीत ३९ सदस्य असून महाराष्ट्रातून मुकुल वासनिक, अशोक चव्हाण, अविनाश पांडे, रजनी पाटील आणि माणिकराव ठाकरे (प्रभारी), चंद्रकांत हंडोरे (कायम निमंत्रित), प्रणिती शिंदे आणि यशोमती ठाकूर (विशेष निमंत्रित) या आठ नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. बाळासाहेब थोरात यांच्या जागी अशोक चव्हाण यांचा समावेश झाल्यामुळे बाळासाहेब थोरात यांना कोणती जबाबदारी मिळेल, याकडे लक्ष लागले आहे.
आठपैकी चार विदर्भाचे
महाराष्ट्रातून समावेश करण्यात आलेल्या आठ प्रतिनिधींमध्ये चार मराठा, तीन महिला, तीन अनुसूचित जातीच्या तसेच एका ब्राह्मण नेत्याचा समावेश आहे. त्यात विदर्भातून चार, मराठवाड्यातून दोन, तर पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतून प्रत्येकी एका नेत्याचा समावेश आहे.
प्रदेशाध्यक्ष पटोलेच?
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना हटविण्यासाठी जोरदार मोहीम सुरू होती. अशोक चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविले जाईल, असे संकेतही श्रेष्ठींकडून देण्यात येत होते; पण चव्हाण यांचा कार्यकारिणीत समावेश झाल्याने पटोले हेच कायम राहण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकांवर नजर
चालू वर्षाअखेर मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगण, मिझोराम या राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांवर नजर ठेवून कार्यकारिणीची रचना करताना सचिन पायलट यांच्यासह राजस्थानच्या ४ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे दिग्विजय सिंह यांच्यासह तीन सदस्यांना स्थान मिळाले, तर छत्तीसगडच्या ताम्रध्वज साहू आणि फुलोदेवी नेताम व तेलंगणच्या दोन नेत्यांना स्थान मिळाले आहे.
काेणाला किती वाटा? : उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, पंजाब (प्रत्येकी ६), दिल्ली (५), राजस्थान (४), मध्य प्रदेश, गुजरात, हरयाणा, बिहार, आंध्र, तामिळनाडू (प्रत्येकी ३), तेलंगण, प. बंगाल, छत्तीसगड, हिमाचल, जम्मू-काश्मीर (प्रत्येकी २), गोवा, आसाम, झारखंड, चंडीगड, ओडिशा, उत्तराखंड, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा (प्रत्येकी १).