ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा-राष्ट्रवादीत चुरशीची लढत, शिंदेगटाचीही मुसंडी तर शिवसेनेची अशी अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 03:04 PM2022-09-19T15:04:45+5:302022-09-19T15:05:43+5:30
Gram Panchayat Election Result: राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळपासून सुरू ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे
मुंबई - राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळपासून सुरू ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे. आतापर्यंतच्या निकालांमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसने तिसरे स्थान पटकावले आहेत. तर शिंदे गटाने चौथ्या स्थानावर मुसंडी मारली आहे. या निकालांमध्ये शिवसेनेचं सर्वाधिक नुकसान झाल्याचं चित्र असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पाचव्या क्रमांकावर फेकली गेली आहे.
एकूण ६०८ ग्रामपंचायतींपैकी ३९८ ग्रामपंचायतींचे निकाल आतापर्यंत हाती आले आहेत. त्यामध्ये भाजपाने ११६ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने १०४ ग्रामपंचायतींमध्ये बाजी मारली आहे. काँग्रेसने ४५ ग्रामपंचातींमध्ये आपल्या विचयाचा झेंडा रोवला आहे. तर बंडखोर शिंदे गटाने ३९ ग्रामपंचायतींमध्ये बाजी मारली आहे.
पक्षामध्ये झालेल्या फुटीचा मोठा फटका शिवसेनेला बसलेला दिसत आहे. शिवसेनेला आतापर्यंत केवळ २० ग्रामपंचायतींमध्येच विजय मिळालेला दिसत आहे. तर इतर पक्ष आणि स्थानिक आघाड्यांनी ७४ ठिकाणी विजय मिळवला आहे.
आघाडीवार विचार केल्यास भाजपा आणि शिंदे गटाला आतापर्यंत १५५ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीने १६९ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. अद्याप दोनशेहून अधिक ग्रामपंचायतींचे निकाल येणे बाकी आहे. त्यामुळे आता या निकालांमध्ये नेमका कोणाचा विजय होणार, याचं चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होऊ शकतं.