CM Devendra Fadnavis ( Marathi News ) : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २०१४ साली पहिल्यांदा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या फडणवीस यांना २०१९ मध्ये दुसऱ्या शपथविधीनंतर केवळ काही तासांत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर २०२२ साली सरकार आल्यानंतरही त्यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं. मात्र आता भाजपला ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. या राजकीय चढ-उतारांबाबत बोलताना मागील १० वर्षांतील अनुभवांतून आपण अधिक प्रगल्भ झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मागील १० वर्षांचा प्रवास चढ-उतारांचा राहिला आहे. भाजपमध्ये आम्हाला एक गोष्ट शिकवली जाते, जेव्हा निवडणुकीत आपला विजय होतो तेव्हा ते एक टीम वर्क असतं आणि जेव्हा पराजय होतो तेव्हा तो एक धडा असते. या सर्व कालखंडात मला शिकवणूक मिळाली आहे आणि मी माझी तुलना २०१४ च्या देवेंद्र फडणवीसांसोबत केली तर आज मी स्वत:ला अधिक प्रगल्भ झाल्याचं मानतो. कारण वेगवेगळ्या अनुभवांमधून वास्तव आपल्या लक्षात येतं आणि काही आघात सहन केल्यामुळे आपली शक्ती वाढते, आत्मिक ताकद वाढते. तसंच एखाद्या परिस्थितीचा सामना कसा करावा, हेही आपल्याला कळतं. त्यामुळे माझ्यात मागील १० वर्षांत बदल झाला असून तो चांगल्या दिशेने झाला आहे," असं म्हणत फडणवीस यांनी मागील दशकभराच्या राजकीय प्रवासावर भाष्य केलं आहे.
विधानसभा निवडणुकीतील विजयाचं कारण कोणतं?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. भाजपनेही आजपर्यंतच्या राज्याच्या राजकारणाच्या इतिहासातील आपली सर्वोत्तम कामगिरी करत १३२ जागांवर विजय मिळवलं. या यशाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आमच्या विजयात नक्कीच हिंदुत्त्वाचा मोठा वाटा आहे. लोकांनी महाविकास आघाडीच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाला उत्तर दिलं आहे. हिंदू समाजाने जातपात विसरून आम्हाला मतदान दिलं. पण त्यासोबत आमच्या सरकारने ज्या योजना राबवल्या होत्या त्यातून आमच्याविषयी प्रो इन्कम्बन्सी तयार झाली आणि त्यामुळे हे यश मिळालं," असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, आगामी काळात नदीजोड प्रकल्प आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे, यावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.