मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
By यदू जोशी | Published: May 9, 2024 08:41 AM2024-05-09T08:41:17+5:302024-05-09T08:47:24+5:30
Maharashtra Lok sabha Election: निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात शहरी मतदारांवर भिस्त, मुंबई आणि परिसर राहणार केंद्रस्थानी
- यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काही सिनेमे असे असतात, की ज्यांची स्टोरी अर्ध्या तासातच समजून जाते. पण काहींमध्ये खूप सस्पेन्स असतो आणि तो हळूहळू उलगडत जातो. प्रेक्षक म्हणून आपण सुरुवातीला जो अंदाज बांधतो, त्याच्या विपरीत सिनेमात पुढे घडत जाते. महाराष्ट्राच्या राजकीय सिनेमाचा मध्यंतर झाला आहे. लोकसभेच्या ४८ पैकी २४ जागांवर निवडणूक झाली असून, २४ मध्ये व्हायची आहे. आता काय होणार? पिक्चर अभी बाकी है दोस्त...
ग्रामीण महाराष्ट्राचे बोट धरून सुरू झालेली लोकसभेची निवडणूक चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात शहरी भागात प्रवेश करणार आहे. उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यासह काही ग्रामीण आणि काही आदिवासी भागदेखील असेलच; मात्र, मुंबई आणि परिसराभोवती ही निवडणूक आता फिरणार आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे संघर्ष तीव्र होईल.
ठाकरे, शिंदे यांची सर्वांत मोठी परीक्षा
उद्धव सेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि शिंदे सेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी उरलेले दोन टप्पे परीक्षेचे असतील. शिंदे यांच्या वाट्याला आलेल्या १५ पैकी नऊ जागांची निवडणूक या दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. त्यात त्यांचा गड मानला जाणारा ठाणे आणि कल्याण हे दोन मतदारसंघदेखील आहेत. मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये उद्धव ठाकरे भारी का एकनाथ शिंदे भारी, याचा फैसलाही यानिमित्ताने होणार आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेले औरंगाबाद उद्धव ठाकरेंचे की एकनाथ शिंदे यांचे, याचा कौल मतदार देणार आहेत.
हे प्रश्न रडारवर....
उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा फटका कोणाला बसेल?
नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात कांदा कोणाला रडवणार?
मुंबईत मराठी, बिगर मराठी मतांचे राजकारण कसे वळण घेईल?
विदर्भात उरले कवित्व
विदर्भातील सर्व दहा जागांची निवडणूक आटोपली आहे. तिथे आता निकालाचे कवित्व तेवढे उरले आहे. उन्हानेकाहिली होत असताना निकालाचे आडाखे-तडाखे बांधले जात आहेत. ज्या विषयाची निवडणुकीत दरवेळी विदर्भात मोठी चर्चा होते, त्या सट्टा बाजाराचा कौल कोणाकडे हादेखील चर्चेचा विषय आहे. सोबत आपापल्या परीने प्रत्येकजण जातीय समीकरणांची फोडणी देत आहे. डीएमके म्हणजे ‘दलित, मुस्लिम, कुणबी’ या फॉर्म्युल्याची चर्चाही जोरात सुरू असल्याचे दिसते.
शहरी मतदार कोणासोबत?
आधीच्या तीन टप्प्यांमधील मतदानाचा आगामी दोन टप्प्यांवर काय परिणाम होतो, हेही महत्त्वाचे असेल. पुणे, मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील मतदारसंघ उर्वरित दोन टप्प्यांमध्ये प्रामुख्याने आहेत. एमएमआर क्षेत्रात राजकीय समीकरणे ही जातीपलीकडची असतात. मोदी विरुद्ध ठाकरे, मोदी विरुद्ध राहुल गांधी या राजकीय संघर्षात मतदार कोणासोबत ते ठरेल. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका तेवढी महत्त्वाची नव्हती. मात्र, आता ते सभांचा सपाटा लावतील का आणि त्यात कोणावर कशी तोफ डागतील, याविषयी उत्सुकता असेल.
पवार फॅमिली वॉरवर तूर्तास पडदा
बारामतीतील लढतीच्या निमित्ताने शरद पवार विरुद्ध अजित पवार आणि एकूणच पवार कुटुंबातील वाद याची प्रचंड चर्चा प्रचार काळात झाली. पवार कुटुंबातील अजित पवार, सुनेत्रा पवार आणि त्यांची दोन मुले वगळता, इतर सर्व सदस्य हे शरद पवार यांच्यासोबत असल्याचे दिसले.
आतापर्यंत अभेद्य राहिलेल्या पवार कुटुंबात मोठी दरी निर्माण झाल्याचे महाराष्ट्राने बघितले. आता बारामतीची निवडणूक आटोपली असल्याने पवार कुटुंबातील वॉर तूर्तास थांबले आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने-सामने आहेत, असे चित्र असलेल्या शिरूर मतदारसंघात फक्त आता मतदान बाकी आहे.
अजित पवारांची पाव परीक्षा बाकी
अजित पवार गटाला मिळालेल्या चार पैकी तीन जागांची म्हणजे बारामती, उस्मानाबाद आणि रायगडची निवडणूक झाली आहे. आता त्यांचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिरूरची निवडणूक तेवढी बाकी आहे.
अजित पवार आणि त्यांच्या सहकारी आमदारांचा प्रभाव असलेल्या पट्ट्यात, विशेषतः उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे सेनेला त्यांची किती मदत होते हे महत्त्वाचे असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठाही पणाला लागलेली आहेच.