"विकासाच्या नावाखाली कोकणाला भकास करण्याचे काम सुरू आहे", नाना पटोले यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 07:01 PM2024-07-21T19:01:29+5:302024-07-21T19:02:07+5:30

Nana Patole Criticize Mahayuti Government:  विकासाच्या नावाखाली कोकणाला भकास करण्याचे काम सुरु आहे. कोकणी माणसाचा नाही तर सत्तेतील महायुतीच्या नेत्यांचा विकास झाला आहे. महायुती सरकारने काही काम केले नाही म्हणून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लीम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

"In the name of development, work is going on to destroy Konkan", Nana Patole's criticism | "विकासाच्या नावाखाली कोकणाला भकास करण्याचे काम सुरू आहे", नाना पटोले यांची टीका

"विकासाच्या नावाखाली कोकणाला भकास करण्याचे काम सुरू आहे", नाना पटोले यांची टीका

मुंबई - कोकण हा काँग्रेस विचाराचा आहे, आजही कोकणात अनेक ग्रामपंचायती काँग्रेसच्या आहेत. जनतेच्या मनात काँग्रेस आहे पण त्यांच्यापर्यंत नेत्यांनी गेले पाहिजे. गुंडगिरी किंवा धनशक्तीला जनता भीक घालत नाही व काँग्रेसला त्याचा फरक पडत नाही, आत्मविश्वासाने काम करा. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला जनतेने भरघोस विजय मिळवून दिला आहे. आता विधानसभा निवणुकीसाठी कोकणातील पक्ष संघटना मजबूत करा. यावेळी विधानसभा निवडणुकीत कोकणात काँग्रेसच्या विजयाचा झेंडा फडकला पाहिजे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

नाना पटोले रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा येथील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते. ते म्हणाले की, विकासाच्या नावाखाली कोकणाला भकास करण्याचे काम सुरु आहे. कोकणी माणसाचा नाही तर सत्तेतील महायुतीच्या नेत्यांचा विकास झाला आहे. महायुती सरकारने काही काम केले नाही म्हणून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लीम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. कोल्हापुरात विशाळगडावर धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. कोकणातही हिंदू मुस्लीम एकत्र राहतात, मंदिरात मुस्लीम लोक दिसतात तर दर्ग्यात हिंदु लोक दिसतात पण त्याला छेद देण्याचे काम सुरु आहे, त्याला बळी पडू नका. लोकसभेला मविआचे ३२ खासदार विजयी झाल्याने विधानसभेला सत्ता जाणार या भितीने हे वाद निर्माण केले जात आहेत. लाडकी बहिण, लाडका भाऊ या योजना आणल्या आहेत, महागाईत बहिणींच्या चुली बंद केल्या त्यावेळी महायुती सरकारला त्यांची आठवण झाली नाही आता निवडणुकीमुळे आठवण झाली आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

या मेळाव्याला रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश लाड, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विभावरी जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, विधान परिषद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेस पक्षाने लढवली, त्यासाठी वर्षभर सदस्य नोंदणी करून ७० हजार सदस्यांची नोंदणी केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनेही सदस्य नोंदणी केली, पण आपण विजय मिळवू शकलो नाही. काँग्रेस पक्षाला कोकणात पुन्हा गतवैभव आणायचे असेल तर जनभावना लक्षात घेऊन काम केले पाहिजे, मी मोठा ही भावना योग्य नाही. मी म्हणजे पक्ष ही भावना पक्षाच्य़ा वाढीला मारक आहे. विधानसभा निवडणुकीसाठी कमी वेळ आहे पण आतापासूनच कामाला लागा. प्रत्येक काँग्रेस नेत्याच्या घरावर काँग्रेसचा झेंडा दिसला पाहिजे. विधान सभा निवडणुकीत कोकणातून काँग्रेसचे उमेदवार विजयी करा आणि कोकणात काँग्रेस नाही असे म्हणणाऱ्यांची तोंडे बंद करा, असेही नाना पटोले म्हणाले.

 

Web Title: "In the name of development, work is going on to destroy Konkan", Nana Patole's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.