दीपक भातुसे
मुंबई : अजित पवार यांनी बंड करून राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली खरी; मात्र वाटाघाटीत ठरलेली खाती मिळत नसल्याने या नऊ मंत्र्यांचे खातेवाटप ११ दिवसांपासून रखडले आहे.
मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी अजित पवार यांच्या भाजपबरोबर वाटाघाटी होऊन किती मंत्रिपदे आणि कोणती खाती मिळणार, हे ठरल्याचे सांगितले जात होते. या वाटाघाटीनुसार काही महत्त्वाची खाती अजित पवारांसह त्यांच्या गटातील मंत्र्यांना मिळणार होती. त्यात अर्थखात्याचाही समावेश असल्याचे सांगितले जात होते. अजित पवारांना अर्थखाते मिळणार याची जाहीर चर्चा सुरू झाल्यानंतर शिंदे गटाने त्याला तीव्र विरोध केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असताना अजित पवार निधी देत नाहीत, अशी टीका शिंदे गटातील आमदार बाहेर पडल्यानंतर करत होते. त्यामुळे पुन्हा अजित पवारांकडे अर्थखाते गेले तर ते शिंदे गटासाठी अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे शिंदे गटाने अर्थखाते अजित पवारांना मिळू नये, यासाठी तीव्र विरोध सुरू ठेवला असल्याचे समजते.
‘अर्थ’ऐवजी महसूल, ऊर्जा देण्याची तयारी? अजित पवार गटाला गृह आणि जलसंपदा ही महत्त्वाची खाती द्यायला भाजपही तयार नसल्याचे समजते. ‘अर्थ’ऐवजी महसूल, ऊर्जा किंवा सार्वजनिक बांधकाम खाते देण्याची तयारी भाजपने दाखवल्याचे समजते.
दोन दिवस बैठका; पण तोडगा नाहीअडलेले खातेवाटप मार्गी लागावे म्हणून मंगळवारी रात्री उशिरापर्यंत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. मात्र, या बैठकीतूनही खाते वाटपावर तोडगा निघू शकला नसल्याचे समजते. त्यानंतर मंगळवारी पुन्हा फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर एक बैठक पार पडली. या बैठकीला फडणवीस यांच्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते. वाटाघाटीत ठरलेली खाती आपल्याला मिळावी, असा राष्ट्रवादीचा आग्रह असल्याचे समजते. तर शिंदे गटाचा विरोध लक्षात घेऊन वाटाघाटीत ठरलेली काही महत्त्वाची खाती द्यायला आता भाजप तयार नसल्याचे समजते.