मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्ह्यातील इतर पक्षाच्या महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश सोहळा शिवतीर्थ निवासस्थानी पार पडला. मात्र यापुढे मनसे सोडून गेलेले आमदार, काही नगरसेवक परतीच्या वाटेवर असल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधवांनी दिली असून राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात त्याची पहिली झलक पाहायला मिळेल असा दावा त्यांनी केला.
मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, एक खंबीर नेतृत्व हवं होतं, सन्मानाने काम करता यावं म्हणून संतोष शिंदे यांनी प्रवेश केला आहे. ठाणे, मुंबई, पालघरमधून असे अनेक पक्षप्रवेश तुम्हाला येत्या काही काळात पाहायला मिळतील. अनेकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत यायचंय. आता जर पाहिले तर विविध पक्षातील नगरसेवक, आमदार हे मनसेतून निवडून आलेलेच लोक आहेत. जी तिथे गेली. ते सगळे आता परतीच्या वाटेवर आहेत. पुढच्या काही दिवसांत जे मनसेतून बाहेर पडलेले नगरसेवक, आमदार आहेत ते पुन्हा पक्षात येताना दिसतील. त्याची एक झलक राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात तुम्हाला दिसून येईल असं त्यांनी दावा केला.
तसेच ज्यापद्धतीचे राजकारण सध्या ठाणे जिल्ह्यात सुरू आहे ते पाहता पुढच्या काही दिवसांत मनसेत खूप मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतील आणि हे सतत सुरू राहतील. आयाराम गयाराम सगळ्यांनाच तिथे घेतले जातंय. त्यामुळे तिथे जे निष्ठावंत आहेत ते प्रचंड नाराज आहेत. जे निष्ठावंत आहेत त्यांना मनसे हा चांगला पर्याय वाटतो. म्हणून हे सगळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत येत्या काळात दिसतील असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शिवसेना भिवंडी लोकसभा उपजिल्हाप्रमुख संतोष शिंदे यांनी त्यांच्या समर्थक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा शिवतीर्थ निवासस्थानी पार पडला. या पक्षप्रवेशाला मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश जाधव आणि पक्षाचे उपाध्यक्ष डी.के म्हात्रे हे उपस्थित होते. मागील काही काळापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने पक्ष बैठका घेत निवडणुकीचा आढावा घेत आहेत. त्यात मनसे लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याची माहिती आहे.