येत्या दोन-तीन दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, बरेच फेरबदल होणार, नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 11:47 AM2023-07-09T11:47:40+5:302023-07-09T11:48:15+5:30
Maharashtra Government: एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या आणि भाजपामधील अनेक इच्छुकांना अद्यापही मंत्रिपदाची प्रतीक्षा आहे. मात्र आता ही प्रतीक्षा संपण्याची चिन्हे असून, येत्या दोन ते तीन दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर गतवर्षी राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि शिंदेगटाचं सरकार स्थापन झालं होते. त्यानंतर या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बरेच दिवस अडकला होता. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात काही मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर जवळपास गेले दहा महिने मंत्रिमंडळातील निम्म्या जागा रिक्त होत्या. दरम्यान, गेल्या रविवारी घडलेल्या नाट्यमय घडामोडीत अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या आणि भाजपामधील अनेक इच्छुकांना अद्यापही मंत्रिपदाची प्रतीक्षा आहे. मात्र आता ही प्रतीक्षा संपण्याची चिन्हे असून, येत्या दोन ते तीन दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तार करताना आहे त्या मंत्रिमंडळात काही फेरबदल होण्याची तसेच काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटातील काही मंत्र्यांना वगळलं जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार करताना इच्छुक आमदार नाराज होणार नाहीत, याची काळजी, भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांना घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळामध्येही महाराष्ट्रात भाजपासोबत आलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना प्रत्येकी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. केंद्रातील मंत्रिपदासाठी शिंदे गटाकडून राहुल शेवाळे, भावना गवळी, गजानन कीर्तिकर यांची नावं आघाडीवर आहेत. तर अजित पवार गटाकडून मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.