अजित पवांरांसोबत पक्षनेत्यांची बैठक संपली; विधानसभेला NCP किती जागा लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 05:41 PM2024-09-03T17:41:04+5:302024-09-03T17:42:11+5:30
संजय राऊतांच्या डोक्यावर फार परिणाम झाला असल्याने ते चोरण्याच्या भाषा करतायेत. राऊतांना गांभीर्याने घ्यावे इतके ते राजकीय महत्त्वाचे राहिले नाहीत असा टोला सुनील तटकरेंनी लगावला.
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची बैठक पार पडली. यात पक्षाच्या ५४ आणि अपक्षांच्या ६ जागा ते धरून पुढे कामाला लागा असं अजित पवारांनी बैठकीत सांगितले. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना उमेदवारी दिली जावी. जागावाटपाची प्राथमिक बैठक झालेली आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर सुनील तटकरे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी महायुतीची नागपूरात बैठक झाली, त्यात जागावाटपाचा सर्वसाधारण फॉर्म्युला काय असावा याची प्राथमिक चर्चा झाली. त्यावर आज राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाली. गणेशोत्सवानिमित्त काही काळ जनसन्मान यात्रा थांबवावी लागेल. पक्षातील कार्यकर्त्यांना काही कार्यक्रम दिले जातील यावर आज चर्चा झाली. मागील वेळी आपण ५४ जागा जिंकल्या होत्या. त्यासोबतच जे अपक्ष आपल्यासोबत आहेत ते धरून ६० चा आकडा आहे. ते धरून तुम्ही पुढे वाटचाल करा असं अजितदादांनी म्हटलं. परंतु आम्ही ६० च जागा लढणार ही बातमी चुकीची आहे असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय लोकसभा निवडणुकीत जागावाटप करताना विद्यमान जागांचे सूत्र होते. २०१९ च्या लोकसभेत राष्ट्रवादीच्या ४ जागा निवडून आल्या होत्या. शिवसेना आणि भाजपा एकत्रित लढले होते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात त्यांना यश मिळाले होते. त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या विद्यमान जागा जास्त होत्या. लोकसभेत त्याप्रमाणे सूत्र होते. आता यावेळी सुद्धा तेच असेल. निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार असावा असाही निकष जागावाटपात असावा असं बैठकीत ठरवलं आहे असं सुनील तटकरेंनी सांगितले.
दरम्यान, राजकोट प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली. मात्र पहिल्यांदाच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते एकत्रित येतात. ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारतात हे राजकीय दृष्ट्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला उचित आहे हे वाटत नाही. संजय राऊतांच्या डोक्यावर फार परिणाम झाला असल्याने ते चोरण्याच्या भाषा करतायेत. राऊतांना गांभीर्याने घ्यावे इतके ते राजकीय महत्त्वाचे राहिले नाहीत असा टोला सुनील तटकरेंनी लगावला.
नितेश राणेंचं ते विधान चुकीचे
मशिदीबाबत नितेश राणे यांनी केलेले विधान अतिशय अयोग्य आहे. त्याचा मी निषेध करतो. हा देश संविधानाच्या आधारे चालतो. सर्वधर्म समभाव ही देशाची मूळ संकल्पना आहे. मतमतांतरे असू शकतात, विचारधारा वेगळ्या असू शकतात पण याप्रकारची विधाने करणे अयोग्य आहे असं मत सुनील तटकरे यांनी मांडलं आहे.