मुंबई : अधिवेशन सरकारने रेटून नेण्याचा प्रयत्न केला. पण मूळ प्रश्नांपासून सरकारने पळ काढला. हे सरकार व्यक्तिगत हितासाठी काम करते आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संबोधित केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी मात्र यावेळी गैरहजर होते.
राज्यात काही भागांत अतिवृष्टी, काही भागांत दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पण शासनाने त्यांना काहीच मदत जाहीर केलेली नाही. हे फक्त घोषणाबाज सरकार आहे.
ट्रीपल इंजिन सरकार म्हणतात, दोन इंजिन असले की गाडी सरळ चालते. मात्र, इंजिन कोणत्या दिशेला जाते कळत नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
९० मतदारसंघात निधी का नाही?राज्यात २८८ पैकी ९० मतदारसंघात सरकारने कोणताही विकासनिधी दिलेला नाही. या मतदारसंघातील जनताही कर भरते, त्यामुळे त्यांचा विकासाचा अधिकार आहे, पण तो दाबण्याचा प्रयत्न सरकारने केल्याची टीकाही यावेळी विरोधकांनी केली.
श्वेतपत्रिका नाही, काळी पत्रिका : दानवे वेदांत-फॉक्सकॉनबरोबर अनेक बैठका होऊन करारनाम्याचा मसुदा तयार झाला होता. टाटा एअर बसचा प्रकल्पही महाराष्ट्रात होण्यासाठी प्रयत्न केला. स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी हे प्रकल्प राज्यात होणार, असे जाहीर केले होते. हे प्रकल्प जाणीवपूर्वक निवडणुकीच्या काळात गुजरातला नेण्यात आले. त्यांनी श्वेतपत्रिका नाही, तर काळी पत्रिका मांडली, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.