कोल्हापूरच्या मातीत अखेर भाजप चीतपट; महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या एकजुटीचा विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 08:58 AM2022-04-17T08:58:44+5:302022-04-17T08:58:44+5:30
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबर २०२१ मध्ये आकस्मिक निधन झाले. जाधव मूळचे भाजपचे...
कोल्हापूर : महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतीलकाँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा १९ हजार ३०७ मतांनी पराभव केला. जाधव यांच्या विजयास महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची भक्कम एकजूट व शिवसेनेने मनापासून केलेली मदत कारणीभूत ठरली.
ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेण्याचा भाजपने आटोकाट प्रयत्न केला; परंतु शाहू महाराजांच्या कोल्हापूरने त्यास मतपेटीतूनच खणखणीत उत्तर देऊन कोल्हापूरचे पुरोगामित्व जपले. जयश्री जाधव या कोल्हापूर शहराच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विरुद्ध पालकमंत्री सतेज पाटील यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईचे या निवडणुकीला स्वरूप आले होते. त्यामध्ये बाजी मारून जिल्ह्याच्या राजकारणात आपणच किंगमेकर असल्याचे सिद्ध केले.
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबर २०२१ मध्ये आकस्मिक निधन झाले. जाधव मूळचे भाजपचे. त्यांच्या पत्नी जयश्री जाधव या तर भाजपच्या नगरसेविका होत्या. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करू या, असे प्रयत्न महाविकास आघाडीतून झाले. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे नातेवाईक असलेल्या माजी नगरसेवक सत्यजित कदम यांना मैदानात उतरवले. कदम यांंनी यापूर्वी २००४ ला काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. महाडिक गट, भाजपची ताकद आणि शिवसेनेचा नाराज मतदार असे गणित जमले तर सहज गुलाल मिळेल, असा त्यांचा होरा होता; परंतु तसे घडले नाही.
मुख्यमंत्र्यांचा शब्द
आम्ही भाजपला सोडलं.. हिंदुत्व नाही. जीव गेला तरी बेहत्तर परंतु बाळासाहेब ठाकरेंचा कडवा शिवसैनिक शब्द बदलणार नाही. त्याला पाठीतून वार करायचे माहीत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता.
उमेदवारांना मिळालेली मते अशी -
जयश्री जाधव (काँग्रेस) - ९७,३३२ (५४.३२%)
सत्यजित कदम (भाजप) - ७८,०२५ (४३.५५%)