पुणे - इंदापूर मतदारसंघावरून महायुतीत भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच असल्याचं समोर आलं आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या पक्षातील आहेत त्यामुळे विद्यमान आमदार ज्या पक्षाचे त्या पक्षाला ही जागा सोडायची ठरवली तर हर्षवर्धन पाटील नाराजी होण्याची शक्यता आहे. त्यातूनच हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर आता हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
भाजपा नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात २८८ मतदारसंघ आहेत, परंतु सातत्याने इंदापूरचीच चर्चा होते हे गेल्या महिनाभरापासून पाहतोय. लोकांच्या भावना समजून घेतोय. त्या भावना तीव्र आहेत कारण लोकसभा निवडणुका म्हटलं की, आम्ही, आमचे कार्यकर्ते खूप चांगले मात्र एकदा लोकसभा निवडणूक झाली तर आम्ही खूप वाईट असं होतो. हे फक्त एका निवडणुकीत झाले नाही तर ६ निवडणुकांमध्ये झालं आहे. २०१९ ला आम्ही सुप्रिया सुळेंना मदत केली. मात्र ३ महिन्यात पुन्हा विधानसभेला आम्हाला डावललं गेले. आता २०२४ ही जागा भाजपाकडे राहील असं वाटलं. त्यात अजित पवार आमच्यासोबत आले. आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला हा त्यांचा अधिकार आहे. कुणाला सोबत घ्यायचे किंवा नाही हे सांगण्याएवढे आपण मोठे नाही. अजितदादा आल्यानंतर ही जागा त्यांना सोडली. पुन्हा आम्ही त्यांचे काम प्रामाणिक केले. आता विधानसभा आली. त्यामुळे विद्यमान आमदाराला जागा सोडायची अशी चर्चा सुरू झाली. जागा विद्यमान आमदाराला जाईल की आम्हाला सोडली जाईल याबाबत आम्हाला कुठलीही कल्पना नाही. त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. मला कुणीही संपर्क साधला नाही. या प्रश्नावर माझ्याशी कुणी बोलले नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिले.
तर गेल्या १० वर्षापासून आमच्या कार्यकर्त्यांवर संघर्षाचा काळ राहिलेला आहे. कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल झालेत. इंदापूर तालुक्याची ओळख ही भ्रष्ट तालुका अशी झालीय. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बदल घडवून आणायचाय असं जनतेला वाटतं. अजून जागावाटपाची चर्चा व्हायची आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात यावर चर्चा होईल. सध्या कोण कुठून उभा राहणार हे स्पष्ट नाही. जागावाटपाचा निर्णय महायुतीचे सर्व नेते एकत्रित येऊन घेणार आहेत. त्यामुळे इंदापूरमधून कोण लढेल हे त्यात ठरेल असं विधान भाजपा नेत्या आणि हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी केले आहे.
दरम्यान, प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांचा नेता मोठा व्हावा असं वाटत असतं. हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनाही तेच वाटते. माझ्या कार्यकर्त्यांनाही ते वाटते. कार्यकर्त्यांची भावना काही चुकीची नाही. जर हर्षवर्धन पाटलांना महायुतीची उमेदवारी मिळाली तरी मी जोमाने काम करणार असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे इंदापूर मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.