महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीपेक्षा बदल्याचेच राजकारण पहायला मिळणार आहे. काँग्रेस, भाजपा राहिली बाजुला राष्ट्रवादीचे दोन गट आणि शिवसेनेचे दोन गट एकमेकांना भिडणार आहेत. यात दोघांच्या भांडणात तिसऱ्याचीच चांदी होण्याची शक्यता असून प्रचार ऐन रंगात आलेला असताना एबीपी-सीव्होटरचा राज्यातील फायनल ओपिनिअन पोल जाहीर झाला आहे.
भाजपा वि. काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी व अजित पवारांची राष्ट्रवादी असा सामना असणार आहे. यामध्ये कोणाला किती जागा जिंकता येणार याबाबत ओपिनिअन पोलमध्ये आकडेवारी देण्यात आली आहे. आता जागावाटप जवळपास पूर्ण होत आले आहे. मविआमध्ये सर्व उमेदवार जाहीर झाले आहेत तर महायुतीत काही जागांवर उमेदवार जाहीर व्हायचे आहेत.
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी भाजप प्रणित महायुतीला ३० जागा मिळण्याचा अंदाज या सर्व्हेमध्ये दाखविण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला १८ जागांवर यश मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर अन्य किंवा अपक्षांच्या खात्यात एकही जागा जाणार नसल्याचा अंदाज आहे.
मतदानाची टक्केवारीवर यामध्ये अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये महायुतीला ४५ टक्के, महाविकास आघाडीला ४१ टक्के तर अन्यला १४ टक्के मतदान होणार असल्याचा अंदाज आहे. महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना २१, शरद पवारांची राष्ट्रवादी १० आणि काँग्रेस १७ जागांवर निवडणूक लढविणार आहे.