मुंबई - MNS In Mahayuti ( Marathi News ) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नुकतेच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या सत्ताधारी महायुतीला मनसेचीही साथ मिळणार असल्याचे बोलले जाते. मनसेच्या ३ नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीत युतीबाबत चर्चेला सुरुवात झाल्याचं सांगण्यात येत आहे.
मागील गुरुवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मनसे नेत्यांची भेट झाली. त्यानंतर मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेण्यात आली. याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात भाजपा-मनसे-शिवसेना यांच्यात संवाद होतोय. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सदिच्छा भेट घेतली आहे. त्यात युतीचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी भेट नव्हती असं सांगितले आहे. मनसेकडून थेट युतीवर भाष्य टाळलं असले तरी आगामी निवडणुकांमुळे या भेटींना महत्त्व प्राप्त झाले आहे. ही सदिच्छा भेट सांगण्यात येत असली तरी त्यात युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं पुढे येत आहे.
मनसेच्या महायुतीमधील समावेशाआधी काही फॉर्म्युला ठरवले जातील. किमान समान कार्यक्रम आखले जातील. त्यानंतर युतीत रुपांतर होईल. सध्या भाजपा-शिवसेना या नेत्यांकडून मनसेच्या समावेशाबाबत सूचक विधाने केली जात आहे. मनसे आणि आमच्या विचारधारेत काही फरक नाही. मनसेसोबत आल्यास स्वागत करू असं भाजपा नेते बोलत आहेत. सध्या हिंदूत्वाच्या भूमिकेवर मनसे-शिवसेना-भाजपा एकमेकांना पूरक आहेत. ठाकरेंसारखा ब्रँड महायुतीसोबत जोडला जाऊ शकतो. या सगळ्या रणनीतीबाबतच चर्चा होत आहे. काही दिवसांनंतर या तिन्ही पक्षाच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. त्यामुळे भविष्यात महायुतीत मनसेच्या सहभागाची शक्यता वाढली आहे.
दरम्यान, मागील वर्षभराच्या काळात राज ठाकरे-एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बऱ्याच भेटी झाल्यात. मनसेच्या मराठी भूमिकेमुळे उत्तर भारतात कुठलेही अडचण येणार नाही यासाठी भाजपाच्या मनात संभ्रमाचे वातावरण होते. परंतु अलीकडच्या काळात मनसेनं मवाळ पद्धतीने भूमिका घेत हिंदूत्वावर आक्रमक भूमिका मांडली आहे. त्यामुळे तीदेखील अडचण दूर झाली आहे. लोकसभा निवडणुकीत २००९ ची निवडणूक वगळता मनसेने फार ताकद लावली नाही. परंतु मागच्या ५ वर्षात राज्यातील राजकारणात बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. त्यामुळे मनसे थेट युतीत सहभागी होणार की राज्यसभा, विधान परिषदेच्या जागा सोडून लोकसभेत मनसेचा पाठिंबा घ्यायचा यादृष्टीने ही पाऊले पडताय असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी म्हटलं.