एल्विश यादव वर काही लोकांनी आरोप करायचा प्रकार केलेला आहे. मी जर गुन्हेगार असेल तर माझ्यावर कारवाई करा असे स्वतः यादवने सांगितले आहे. हिंदुत्वावर बोलणारा लोकप्रिय असणारा माणूस त्याच्यावर कुठलेही आरोप करून त्याला कुठल्याही बाबीत अडकवायचा हा प्रकार काही लोक करत आहेत. राऊत आणि त्यांच्या उबाठा गटाने हिंदुत्व तर सोडलेलेच आहे, परंतु हिंदुत्वावर जो बोलेल त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी हे लोक करत आहेत, अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे.
मला वाटतं हे चुकीचे आहे. तो जर आरोपी असेल तर निश्चित त्याच्यावरती कारवाई करा, कधीही आम्ही त्याचे समर्थन करणार नाही. परंतु बळजबरी आरोपी बनवणे हा जो काही प्रकार सुरू केलेला आहे, हे बरोबर नाही. म्हणून आम्ही त्याच समर्थन करत नाही. पण जर तो आरोपी नसेल तर निश्चित आम्ही त्याचं समर्थन करू, असे शिरसाट म्हणाले.
आजकाल संजय राऊत यांना लोकांचे काय काय पाहायचे असते, स्वतः राऊत कोणत्या हॉटेलमध्ये कोणाबरोबर थांबायचे? हे जर आम्ही बोललो तर मग तुम्हाला कळेल कोणत्या हॉटेलवर राऊत थांबल्यावर त्यांच्या हॉटेलची बिल कोण भरायचे ते? जे आज तुमच्या नावाने रडतायत तेच तुमच्या हॉटेलची बिल भरायचे. कृपया राजकारणामध्ये वैयक्तिक गोष्टींवर जाऊ नका, ड्रग्ज सेवन कुठेही कुठल्याही खासदाराने केलेले नाहीय. त्याबद्दल तुम्ही जो गैरसमज पसरवत आहात तो चुकीचा आहे. आपले झाकून ठेवून इतरांवर जर तुम्ही आरोप करत असाल तर त्याचा पुराव्यासह उत्तर दिले जाईल, असा इशारा शिरसाट यांनी दिला.