मुंबई : राज्यातील भीषण दुष्काळामुळे शेतकरी पेरणी करण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्याऐवजी त्यांना मोफत बियाणे, खत, कीटकनाशके व शेतीची मशागत करण्याठी प्रत्येकी दोन मजूर द्यावेत, अशी मागणी दुष्काळग्रस्त- कोरडवाहू शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. या मागण्या मान्य करून घेण्यासाठी १ जूनपासून बेमुदत उपोषणावर जाण्याचा इशाराही या संघटनेने शनिवारी पत्रकार परिषदेदरम्यान दिला.या उपोषणात शेकाप, भाकपा, माकपा, भारिप बहुजन महासंघ तसेच विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील अनेक संघटना सहभागी होणार आहेत.शेतकऱ्यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे देण्यात यावी, आदिवासी आश्रमशाळांना अनुदानित शाळेचे परिरक्षण अनुदान किमान अडीच हजार रुपये प्रति महिना करावे आणि राज्यातील सरकारी वसतिगृहांमध्ये उपेक्षित घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी सरकारने घ्यावी, याही मागण्या या वेळी करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बेमुदत उपोषण
By admin | Published: May 29, 2016 2:02 AM