तळेगाव दाभाडे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीवरील सोमाटणे पंप हाऊसची १७५ अश्वशक्तीची मोटार नादुरुस्त झाली आहे. मोटार दुरुस्त होईपर्यंत आगामी दोन-तीन दिवस शहरातील पाणीपुरवठा कमी दाबाने किंवा दिवसाआड होणार आहे. याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी कैलास गावडे यांनी केले आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मोटार जळाल्याचे मुख्याधिकारी कैलास गावडे यांनी सांगितले. ते म्हणाले की, मोटार दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले असून, दोन-तीन दिवसांत ते पूर्ण होईल. दरम्यान, नागरिकांची पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून रिक्षाने दवंडी देण्यात येत आहे, एसएमएसद्वारे नागरिकांना सूचित करण्यात आले आहे. तसेच, ज्या ठिकाणी पाणी मिळणार नाही, तेथील नागरिकांसाठी नगर परिषदेच्या वतीने टँकरने मोफत पाणीपुरवठा करण्यात येईल.उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ फारशी न बसलेल्या तळेगावकरांना पावसाळ्याच्या तोंडावर मात्र तांत्रिक बिघाडामुळे टंचाईला सामोरे जावे लागत आहे. (वार्ताहर)
तळेगावात अपुरा पाणीपुरवठा
By admin | Published: June 09, 2016 2:11 AM