वसई : चार वेळा लुटूपुटूचे उद्घाटन केले गेल्याने वसईच्या पंचवटी उड्डाण पुलाची लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार असल्याची उपहासात्मक चर्चा वसईत केली जात आहे. ऐन गर्दीच्या वेळीच दररोज उद्घाटन होत असल्याने शेवटी एमएमआरडीएने पुलावर फलक लावून येत १५ दिवसात पूल वाहतूकीसाठी खुला करू अशी हमी दिली आहे. मात्र, या पूलाचे उद्घाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्याचा घाट घालण्यात आला असल्याची महिती सूत्रांनी दिली.
गेल्या ९ वर्षांपासून काममुळे रखडलेला आणि आता पूर्णत्वास येवूनही उद्घाटनाअभावी रखडलेला वसईचा पंचवटी नाक्या जवळील उड्डाणपुल मुख्यमंत्र्याच्या हस्ते लोकार्पण केला जाणार आहे. वसईच्या पूर्व-पश्चिम दिशेला जोडणाऱ्या या पूलाचे काम गेल्या ९ वर्षांपासून संथगतीने सुरु होते.२००६ ला काम सुरु झालेल्या या ७३६ मीटर लांब आणि ११ मीटर रूंदीच्या या पूलाला तब्बल ९ वर्षे लागली. आता गेल्या पंधरवड्यापासून तो वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. या पूलावरील संरक्षक कठड्याचे काम बाकी असल्यामुळे तो खुला करण्यात येत नसल्याचे कारण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त मुख्य अभियंत्यांनी दिले आहे.
मात्र, या कामसाठी फक्त चार तास पुरेसे असतांना बहुजन विकास आघाडीच्या तालावर नाचत एम.एम.आर.डी.ए.ने मुद्दाम काम शिल्लक ठेवले आहे. मुख्यमंत्र्याच्या हस्ते त्याचे उद्घाटन करून त्याचे श्रेय आघाडीला घ्यायचे आहे. त्यामुळे या पूलाचे नाहक लोकार्पण रखडवण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर एमएमआरडीएने मात्र पूलाचे काम पूर्ण होऊन व त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून असलेल्या सर्व चाचण्या घेतल्यानंतरच तो वाहतुकीसाठी खुला करण्याची आपली भूमिका आहे, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याचे उद्घाटन कधी होते याकडे विरार-वसईकरांचेच नव्हे तर सगळ्या पालघरकरांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)आमदार काय म्हणतात : मुख्यमंत्र्याची वेळ निश्चित झाल्यानंतर या पुलावरील संरक्षक कठड्याचे काम सुरु करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्याच्या हस्ते या पूलाचा लोकार्पण सोहळा होणे उचित ठरेल. त्यानिमीत्ताने मुख्यमंत्री वसईत येतील वसईच्या विकासाबाबत यावेळी त्यांचशी प्रत्यक्षात चर्चाही करताय येईल.असे स्पष्टीकरण बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिले आहे.उदघाटनांची झाली अशीही बाऊं ड्रीमाजी आमदार विवेक पंडीत यांनी . शनिवारी हा पूल आंदोलनातून खुला केला. त्यानंतर पोलीसांनी तो पुन्हा बंद केला. दरम्यान, वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे आणि पूल तयार असल्यामुळे वाहन चालकांनीच तो उत्स्फूर्तपणे १५ तारखेला खुला केला होता. त्यानंतर पोलीसांनी तो बंद केला. दुसऱ्याच दिवशी मनसेने हा पूल खुला केला. तर १७ तारखेला जन आंदोलन समितीने पुन्हा पूल सुरु केला.१९ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसनेही उद्घाटन करून हा पूल खुला केला. रविवारी सकाळी काँग्रेसने उद्घाटनाचा कार्यक्रम हाती घेतला होता. मात्र, एमएमआरडीएने काँग्रेसला येत्या १५ दिवसात पूल वाहतूकीसाठी मोकळा केला जाईल, असे लेखी आश्वासन दिल्याने काँग्रेसने रविवारचे आंदोलन स्थगित केले. चार वेळा उद्घाटन झाल्यानंतर तो बंद करण्यात आला. आता पाचव्यांदा मुख्यमंत्र्याच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.चार वेळा उद्घाटन करून खुला झालेला वसईतील हा पूल देशातील एकमेव उदाहरण असेल. चारही वेळा वेगवेगळ्या व्यक्ती, पक्षाने उद्घाटन केल्यामुळे त्याचे वेगळेपणही ठळकपणाने जाणवणार आहे. त्यामुळे या आगळ्या-वेगळ्या विक्रमाची लिम्का बुक आॅफ रेकॉर्डकडून नक्कीच दखल घेतली जाईल.अशी उपहासात्मक चर्चा केली जात आहे.