तिवसा (अमरावती) : ग्रामीण भागातील व आदिवासी क्षेत्रातील मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी येत्या काही महिन्यांत राज्यात ५५१ विज्ञान केंद्र्रे उभरणार असल्याची माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी नजीकच्या गुरुकुंज मोझरी येथे दिली.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी असलेल्या गुरुकुंज मोझरी येथे राज्यातील पहिले किलबिल विज्ञान केंद्र व तारांगणचे उद्घाटन करण्यात आले. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विकासासाठी प्रत्येक तालुक्यात केंद्र स्थापन होईल. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठ्या तालुक्यांमध्ये दोन विज्ञान केंद्रे स्थापन केली जातील, असे ते म्हणाले. यावेळी आदिवासी विकास विभाग (नागपूर)च्या अप्पर आयुक्त माधवी खोडे यांनी या प्रकल्पाविषयी माहिती दिली. आदिवासी विभागात जास्तीत जास्त विज्ञान केंद्रे व्हावीत, यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सचिव जनार्दनपंत बोथे, खगोल शास्त्रज्ञ नंदकिशोर कासार, दिलीप काळे, सुभाष गवई, मधुकर गुंबळे उपस्थित होते. यानिमित्ताने नंदकुमार व अन्य मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
राज्यात विद्यार्थ्यांसाठी ५५१ विज्ञान केंद्रे , पहिल्या आदिवासी विज्ञान केंद्राचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 6:49 PM