ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 10 - प्रत्येक चित्रपटाची पटकथा ही आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना, घडामोडींवर आधारित असते. अनेक चित्रपटांच्या पटकथेतून दिग्दर्शक मंडळीने वास्तवतेवर प्रकाश टाकलेला असतो. त्यामुळे असे चित्रपट लोकांना खूप भावतात. चित्रपटातून भूतकाळासह वर्तमानात घडणाऱ्या घडामोडींची माहिती होत असल्याने चित्रपट समाजाचा खरा आरसा आहेत; असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही, असे मत हरिद्वार (उत्तरांचल) येथील देव संस्कृती विश्व विद्यालयाचे संचालक मंगल गढवाल यांनी व्यक्त केले.केसीई सोसायटीच्या ओजस्विनी कला महाविद्यालयात बुधवारी सकाळी ११ वाजता ‘फिल्म मेकिंग फेस्टीवल २०१६’चे थाटात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना मंगल गढवाल बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता बी.व्ही. पवार, देव संस्कृती विश्व विद्यालयातील अॅनीमेटर गगन सिन्हा, मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश काटे यांची उपस्थिती होती. उद्घाटन कार्यक्रमानंतर दुपारी १२ ते १ या वेळेत डॉक्युमेंटरी फिल्म प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यात नर्मदा नदीवर आधारित डॉक्युमेंटरी फिल्म दाखविण्यात आली. डॉक्युमेंटरी फिल्म म्हणजे काय? ती कशी तयार होते? त्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात, याविषयी मंगल गढवाल यांनी माहिती दिली. फिल्म फेस्टीवल हा १० ते १२ आॅगस्ट दरम्यान होणार आहे. त्यात चित्रपट निर्मितीतील एडिटींग, कॅमेरा हाताळणे, स्क्रिफ्ट रायटींग, अॅक्टींग अशा विविध विषयांवर माहिती दिली जाणार आहे.
जळगावात ‘फिल्म मेकिंग फेस्टीवल'चे थाटात उद्घाटन
By admin | Published: August 10, 2016 5:29 PM