पुणे : कोरेगाव भीमा येथील घटना हा पूर्वनियोजित कट होता. या प्रकरणातील मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. हल्ल्याशी नक्षलवाद्यांचा कोणताही संबंध नाही. यामुळे परिसरातील गावांमधील भयभीत सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना संरक्षण देण्याबाबत जिल्हाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची चर्चा झाल्याचेही आठवले यांनी सांगितले.कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.याप्रसंगी पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआयचे नेते परशुराम वाडेकर, हणमंत साठे, बाळासाहेब जानराव आदी उपस्थित होते.आठवले म्हणाले, अॅट्रोसिटी कायद्यावरून मराठा समाजामध्ये काही गैरसमज निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरेगाव भीमा व परिसरातील गावांमध्ये अनुचित प्रकार घडला. त्यात संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भिडे व एकबोटे यांची छायाचित्र आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही; असा समज करून घेणे चुकीचे आहे.समिती स्थापन करावीछत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू येथील समाधीसाठी माझ्या खासदार निधीतून रक्कम देण्याची इच्छा आहे. त्याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. गोविंद महाराज यांच्याही समाधीस निधी दिला जाईल. संभाजी महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यामध्ये गोविंद महाराज होते किंवा नव्हते; याबाबत वढू ग्रामस्थांमध्ये संशय आहे. गोविंद महाराज हे संभाजी महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार करणाºया सेवेकºयांमध्ये होते, असा परंपरागत इतिहास चालत आलेला आहे, असेही आठवले यांनी सांगितले.प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यात आमचेही कार्यकर्ते सहभागी झाले होते. संविधानाला कोणीही हात लावू शकणार नाही. त्यामुळे संविधान बचाव रॅली काढणाºयांनी स्वत:चा पक्ष वाचविण्याचा विचार करावा. राजकारण करताना समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये.- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
कोरेगाव भीमा येथील घटना पूर्वनियोजित कटच होता : रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 03:19 IST