Maharashtra Election 2024: महाराष्ट्रात १५ दिवस विधानसभा निवडणुकीचा प्रचार चालला. प्रचाराला मोजकेच दिवस मिळाल्याने उमेदवार आणि पक्षाचे नेते पायाला भिंगरी लावून फिरले. याच काळात राज्यात निवडणुकीला गालबोट लावणाऱ्या घटनांही घडल्या. उमेदवारांवर हल्ले झाले.
मध्यरात्री राडा; रावत व मुनगंटीवारांवर गुन्हे
चंद्रपूर : मूल तालुक्यातील कोसंबी गावात सोमवारी मध्यरात्री काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला.
मंत्री व भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना धक्काबुक्की केल्याच्या तक्रारीवरून काँग्रेस उमेदवार संतोषसिंह रावत यांच्यासह इतर कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. तर, रावत यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली. यावरून मुनगंटीवार यांच्याविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले.
उद्धवसेना उमेदवाराच्या वाहनावर हल्ला
कल्याण (जि. ठाणे) : कल्याण पूर्वचे उद्धवसेनेचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या वाहनावर सोमवारी रात्री अज्ञातांनी हल्ला केला. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
काही जण पैसे वाटत असल्याची माहिती मिळाल्यावरून बोडारे यांची मुलगी आणि उद्धवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्या शोधात निघाले. त्यावेळी १०-१५ जणांनी त्यांचे वाहन अडवून हल्ला केला.
कुलाबा येथे पैसे वाटपाचा आरोप
मुंबई : कुलाबा मतदारसंघात मंगळवारी रात्री पैसे वाटपाचा आरोप झाला. याप्रकरणात पैसे मिळाले नसून दोन व्यक्ती भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचे छायाचित्र व नाव असलेल्या पावत्या वाटताना आढळून आले, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढेंनी दिली.
याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘वंचित’च्या उमेदवाराच्या वाहनावर हल्ला
कळमनुरी (जि. हिंगोली) : कळमनुरी मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या गाडीवर १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री हल्ला केला. या प्रकरणी पाच अज्ञातांविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मस्के हे कारने हातमालीवरून हिंगोलीकडे जात होते. या दरम्यान तालुक्यातील सेलसुरा फाट्यावर त्यांच्या कारवर अज्ञातांनी दगडफेक केली. याप्रकरणी अफताफ रहीमखां पठाण यांनी तक्रार दिली आहे.
भाजप उमेदवाराच्या बहिणीला मारहाण
अमरावती : धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा महायुतीचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या मोठ्या भगिनी अर्चना रोठे (४९) यांना झालेल्या मारहाणप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अज्ञातांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला.
वैद्यकीय अहवालानंतर यात कलमात वाढ करण्याची तरतूद ठेवण्यात आली असून एफआयआर नोंदविल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांनी दिली.
बारामतीत ‘शरयू मोटर्स’मध्ये शोधमोहीम
बारामती : ‘मविआ’चे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या मालकीच्या शरयू मोटर्समध्ये निवडणूक आयोगाच्या फ्लाईंग स्कॉडने सोमवारी शोधमोहीम राबविली. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी सांगितले की, आयोगाकडे आलेल्या तक्रारीनुसार येथे आम्ही तपासणी केली. परंतु काहीही आक्षेपार्ह आढळले नाही.
तपासणीबाबत श्रीनिवास पवार म्हणाले, सोमवारी रात्री पाच-सहा अधिकारी आले, त्यांनी तपासणी केली. सुरक्षारक्षक व्हिडीओ चित्रीकरण करू लागला; त्यावेळी त्याला रोखण्यात आले. आमच्या वकिलांनी मंगळवारी याबाबत चौकशी केली. तेव्हा तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी केल्याचे सांगण्यात आले; पण तक्रार कोणाची हे मात्र सांगितले नाही.
२.७५ लाखांची रोकड जप्त
जळगाव : मतदानासाठी पैसे वाटप सुरू असल्याच्या संशयावरून करण्यात आलेल्या तक्रारीनुसार जळगावात दोन लाख ७२ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी न्यू बी.जे. मार्केटमधील सायली कॉस्मेटिक या दुकानात करण्यात आली. या ठिकाणी मतदार यादी, महिलांची नावे व संपर्क क्रमांक असलेली यादीही सापडली.