जळगाव : शालेय पोषण आहारात केळीचा समावेश करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन हिल्स येथे शनिवारी आयोजित डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वितरण सोहळ््यात केली. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार होते. शाश्वत सिंचनासाठी जैन इरिगेशनने राज्याचा आराखडा तयार करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विजय आत्माराम इंगळे -पाटील (चितलवाडी, ता. तेल्हारा, जि.अकोला) यांना आप्पासाहेब पवार यांच्या नावाचा पुरस्कार देण्यात आला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन, खा. रक्षा खडसे, कवी ना.धों. महानोर आदी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात केळीचा उल्लेख केला नाही. ते भाषण संपवून आसनाकडे जात असतानाच उपस्थित शेतकऱ्यांनी केळीच्या विषयाचे काय?, असा सवाल केला. त्यामुळे गोंधळ झाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी परत माईकचा ताबा घेत शालेय व अंगणवाडीच्या पोषण आहारात केळीच्या समावेशाचा निर्णय झाल्याची घोषणा केली. (प्रतिनिधी)मुख्यमंत्री म्हणाले की, अनिल व अजित जैन यांच्याशी बोललो. राज्याच्या शाश्वत सिंचनासाठी जैन इरिगेशनने बृहतआराखडा तयार करावा, असे त्यांना सुचविले आहे. जैन इरिगेशनने अनेक प्रयोग केले आहेत. दक्षिणेतून आंबा आणून प्रक्रिया केली जात असल्याचे पाहून आश्चर्य वाटले. कोकणातील आंब्यावर प्रक्रिया करावी, असे आवाहन त्यांनी केले. त्यावर कोकणातही जागा घेतली असून, तेथे हापूसवर प्रक्रिया प्रकल्प सुरू करणार असल्याचे समजल्याने समाधान वाटल्याचे त्यांनी सांगितले.
शालेय पोषण आहारात केळ्यांचा समावेश
By admin | Published: January 10, 2016 1:24 AM