यंदाच्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये ७ नव्या प्रकारांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 07:12 PM2022-12-15T19:12:00+5:302022-12-15T19:12:37+5:30
तारखा ठरल्या, पाच जिल्ह्यांत रंगणार स्पर्धा
मुंबई: राज्यातील शहरी आणि विशेषत: ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातून जगातील प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या दर्जाचे क्रीडापटू तयार व्हावेत, या हेतूने महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन १ ते १२ जानेवारी या कालावधीत करण्यात येणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी केली. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, महाराष्ट्र शासन आणि क्रीडा व युवक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यामाने होणाऱ्या या क्रीडा स्पर्धा पुणे, मुंबई, जळगाव, नाशिक, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांत होणार असून एकंदर ३९ क्रीडा प्रकारांचा यात समावेश आहे.
क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्यााद्री अतिथीगृहात झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा राज्यस्तर आयोजन समितीच्या बैठकीत या स्पर्धेच्या आयोजनासह स्थळे निश्चित करण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, काही अधिकारी मंडळी आणि काही पदाधिकारी उपस्थित होते. "महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील क्रीडा क्षेत्राला एक नवीन आयाम आणि दिशा देण्याचा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा प्रयत्न आहे. या स्पर्धांतून नवे आणि ग्रामीण खेळाडू आकर्षित होतील. ही गुणवत्ता राज्यस्तरावर समोर येईल. या माध्यमातून कोणत्याही क्रीडापटूच्या ऑलिम्पिक स्वप्नासाठी ही पहिली पायरी असेल. या स्पर्धेत नवनवे विक्रम प्रस्थापित होतील. खेळाडू हा केंद्रबिंदू ठेवून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन यशस्वी करू," अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.
"महाराष्ट्रात साधारण २० ते २२ वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत. या स्पर्धा ऐतिहासिक होतील. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा या क्रीडा क्षेत्राला नवीन दिशा देण्याचे काम करतील आणि यामुळे महाराष्ट्रातील खेळाडूंना नवीन स्पर्धा खेळण्याची संधी व अनुभव मिळेल. ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांच्या पावलांवर पाऊल टाकत ऑलिम्पिक पदकाच्या स्वप्नपूर्तीसाठी कृती आराखड्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे ही महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आहे. या स्पर्धेद्वारे ग्रामीण भागातील क्रीडापटूंना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले जाईल," असे अजित पवार म्हणाले.
सात नव्या क्रीडा प्रकारांना स्थान
आतापर्यंत तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कॅनोइंग आणि कयाकिंग, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हँडबॉल, हॉकी, ज्युडो, कबड्डी, खो-खो, टेनिस, मॉडर्न पेंटॅथलॉन, नेमबाजी, रोइंग, रग्बी, जलतरण-वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वांदो, ट्रायथलॉन, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, सायकलिंग (रोड आणि ट्रॅक), नेटबॉल, सेपक टेकरॉ, स्क्वॉश, यॉटिंग असे ३२ क्रीडा प्रकार या स्पर्धेत होते. त्याशिवाय आता, नुकत्याच गुजरात येथे झालेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मल्लखांब, सॉफ्टबॉल, योगासन, रोलर स्केटिंग, सॉफ्ट टेनिस, गोल्फ आणि विशेष बाब म्हणून शूटिंगबॉल अशा सात नव्या क्रीडा प्रकारांचा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा चषक क्रीडामंत्र्यांना सुपूर्द
गुजरातला झालेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी ३९ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ६३ कांस्य अशी एकूण १४० पदकांची लयलूट करीत सर्व राज्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. हा चषक महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सुपूर्द केला.