मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता मराठा समाजाला ओबीसींअंतर्गत कोट्यातून आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यामधून आरक्षण देणं हे मला पटत नाही. असं केल्यास तो ओबीसी समाजावर अन्याय ठरेल, असा दावा शरद पवार यांनी केला.
याबाबत आपली भूमिका मांडताना शरद पवार म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षणासाठी ओबीसींच्या कोट्यामधून वाटेकरी करणं हा ओबीसींमधील गरीब लोकांवर अन्याय ठरेल, असं काहींचं म्हणणं आहे. ही बाब दुर्लक्षित करण्यासारखी नाही. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी आजची ५० टक्क्यांची मर्यादा आहे, त्यात १५-१६ टक्के वाढ केल्यास हा प्रश्न सुटेल. यासाठी ओबीसी आणि इतर लोकांमध्ये मतभेद होता कामा नये. त्यावरून वाद घालण्याचा कुणी प्रयत्न करत असेल, तर त्याला आमचा पाठिंबा नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जखमी आंदोलकांची माफी मागितल्याच्या मुद्द्यावरही शरद पवार यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मला इतके माहिती आहे की जालन्यात संध्याकाळच्या सुमारास हल्ला झाला. तिथे पोलिसांनी हल्ला केलाय हे उघडपणे दिसते. याची चौकशी सरकारने करावी. याचे अधिकार सरकारला आहेत. आम्हाला ते अधिकार नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागणे म्हणजे एकप्रकारे गुन्ह्याची कबुलीच देणे आहे, असे शरद पवार म्हणाले.