ठाणे : लोकसभा निवडणुकीवर आता आयकर विभागाची करडी नजर असणार आहे. विशेषकरून काळ्या पैशांवर नजर ठेवण्यासाठी विशेष शीघ्रकृती पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही पथके निवडणुकीच्या काळात २४ तास कार्यरत असणार असल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर पडत असतो. त्यावर जरब बसविण्यासाठी आयकर विभाग २४ तास कार्यरत असणार आहे. यासाठी ठाणे आयकर विभागाने ५५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुण्याला विशेष कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली आहे. त्याअंतर्गत ४२ लोकसभा क्षेत्रांचा समावेश असणार आहे. यात ठाणे आयकर विभागाचे संयुक्त निर्देशक (अन्वेषण) अभिषेक सिंग यांच्यावर पाच मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याअंतर्गत पालघर, कल्याण, ठाणे, भिवंडी, रायगड या मतदारसंघांचा समावेश असणार आहे. प्रत्येक मतदारसंघात एक उपायुक्त, दोन आयकर अधिकारी, तीन निरीक्षक असे पथक असणार आहे. हे पथक पैसा, सोने, दारू आदींच्या वाटपावर लक्ष ठेवणार आहे.यासाठी १८००२३३०७०० आणि १८००२३३०७०१ हे टोल फ्री क्र मांक कार्यरत असणार आहेत. शिवाय, ७४९८९७७८९८ हा व्हॉट्सअॅपचा क्र मांक असणार आहे. तक्रारदाराने एखाद्या ठिकाणी गैरप्रकार सुरू असल्यास त्याची माहिती देताच कंट्रोल रूममधून तत्काळ स्थानिक शीघ्रकृती पथकाला त्याची माहिती दिली जाणार आहे.त्यानुसार, या तक्रारीची पडताळणी करून अवघ्या अर्ध्या तासात हे पथक संबंधित ठिकाणी पोहोचणार आहे. महत्त्वाचे म्हणजे याकरिता स्थानिक पोलीस अधीक्षक आणि उपायुक्त यांच्याशी संपर्कसाधण्यात येणार असल्याचे ठाणे आयकर विभागाचे संयुक्त निर्देशक (अन्वेषण) अभिषेक सिंग यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीवर आयकर विभागाचा वॉच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 4:41 AM