Income Tax Raid BBC: 14 फेब्रुवारी रोजी आयकर विभागाचे (Income Tax Department) पथक बीबीसीच्या (BBC) मुंबई आणि दिल्ली कार्यालयात पोहोचले होते. आता 55 तासांनंतर आयकर विभागाचे सर्वेक्षण संपले असून, मुंबईतील कलिना येथील बीबीसी कार्यालयून अधिकारी बाहेर पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने बीबीसी कार्यालयातून अनेक कागदपत्रे, पेन ड्राइव्ह आणि हार्ड ड्राइव्ह जप्त केले आहेत.
आयकर विभागाचे एक पथक बॅलार्ड इस्टेट येथील सिंधिया हाऊस येथील मुख्यालयाकडे रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीतील कार्यालयांमध्ये अद्याप सर्वेक्षण सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभाग बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांची पाहणी करत आहे. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अचानक आयटी विभागाची टीम सर्वेक्षणासाठी बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयात पोहोचली होती.
10 वर्षांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणीबीबीसीकडून गेल्या 10 वर्षातील आर्थिक व्यवहारांची मागणी केली जात आहे. काही संगणक आणि फोनचे क्लोन (डंप) केले गेले आहेत, ज्यात परदेशी निधी आणि हस्तांतरणाची चौकशी केली जात आहे. परदेशात केलेल्या काही आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची छाननीही केली जात आहे. आयटी कर्मचारी शिफ्टमध्ये काम करत आहेत. कर्मचार्यांना त्यांच्या मोबाईलमधून कोणताही डेटा हटवू नका असे सांगण्यात आले आहे.
पाहणीदरम्यान कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आलेआयकर विभागाच्या सर्वेक्षणानंतर तेथील कर्मचारीही चक्रावले. यादरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीच्या काही कर्मचाऱ्यांचे फोन जप्त केले होते. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी मोदी सरकारला घेराव घालण्यास सुरुवात केला. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. मोदी सरकारचे हे सूडाचे कृत्य असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
SC मध्ये याचिका दाखलबीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांच्या आयकर विभागाने केलेल्या सर्वेक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. समाजसेवक मुकेश कुमार यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाला प्रेस स्वातंत्र्याचा हवाला देत योग्य आदेश जारी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेत बीबीसीच्या कथित वादग्रस्त माहितीपटावरील बंदी हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे.