Sanjay Raut On BBC: आज 'बीबीसी'च्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक टाकली. मिळालेल्या माहितीनुसार, बीबीसीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे फोनही जप्त करण्यात आले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना कार्यालयातून घरी पाठवण्यात आले आहे. या छापेमारीवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बीबीसीवर आज आयकर विभागाच्या छापेमारीनंतर विरोधकांकडून सत्ताधारी भाजपवर टीका केली जात आहे. अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातच संजय राऊत यांनीही ट्विट करत आपला राग व्यक्त केला आहे. 'भारतातील लोकशाहीची प्रतिमा धोक्यात आहे, हे बीबीसीवरील छापेमारीने दाखवून दिले आहे. भारताच्या लोकशाहीवर दडपशाही होत आहे. न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता हे शेवटचे गड शाबूत आहेत. भारतीय लोकशाहीसाठी आम्ही आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू! जय हिंद!' असे ट्विट राऊत यांनी केले आहे.
काँग्रेसची टीका
दरम्यान, दिल्लीत बीबीसीच्या कार्यालयाचा आयकर विभागाकडून सर्व्हे केला जात असल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे या छापेमारीला काँग्रेसने बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर घातलेल्या बंदीशी जोडले आहे. 'आधी बीबीसीची डॉक्युमेंट्रीवर बंदी घातली. आता बीबीसीवर इन्कम टॅक्सचा छापा टाकला गेला. अघोषित आणीबाणी', असे ट्विट काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आले आहे.
BBC सर्वात भ्रष्ट संघटना- भाजपबीबीसीवरील कारवाईनंतर भाजपच्या नेत्यांनी बीबीसीवर निशाणा साधला आहे. 'बीबीसी ही जगातील सर्वात भ्रष्ट संघटना असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केला आहे. तसेच, त्यांनी या कारवाईवरुन सरकारवर निशाणा साधल्याबद्दल काँग्रेससह विरोधी पक्षांना फटकारले. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही बीबीसीवर बंदी घातली होती अशी आठवण करुन दिली. आयकर विभागाने बीबीसीवर केलेली कारवाई नियमांनुसार आणि घटनेनुसार केली जात आहे, असंही गौरव भाटिया म्हणाले.