सचिन राऊत अकोला, दि. १८- नोटाबंदी झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत सोन्याच्या दागिन्यांसह सोन्याच्या बिस्किटांची मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री करणार्या अकोल्यातील बड्या आणि नामांकित असलेल्या तीन सराफा व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानांवर आयकर खात्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी छापेमारी केली. गुन्हे अन्वेषण विभागाच्या तब्बल ३0 अधिकार्यांचा समावेश असलेल्या पथकाने गांधी चौकातील केजे स्क्वेअर (खंडेलवाल ज्वेलर्स), खंडेलवाल अलंकार केंद्र आणि विश्वकर्मा ज्वेलर्सची संशयावरून तपासणी केल्याची माहिती पथकातील एका अधिकार्याने दिली.नोटाबंदीनंतर दोन दिवसांमध्ये सोने आणि चांदीची मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री केल्याच्या संशयावरून नागपूर येथील आयकर खात्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या तब्बल ३0 अधिकार्यांच्या पथकाने बुधवारी अकोल्यातील वसंत खंडेलवाल यांच्या मालकीच्या खंडेलवाल अलंकार केंद्र, नितीन खंडेलवाल व रवी खंडेलवाल यांच्या मालकीच्या केजे स्क्वेअर आणि केजे-१ व जांगिड यांच्या मालकीच्या विश्वकर्मा ज्वेलर्सवर छापेमारी केली. बुधवारी सकाळी ११ वाजेपासून ही तपासणी सुरू केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरूच होती. या छापेमारीत त्यांनी सोने आणि चांदी खरेदी-विक्रीचे दस्तावेज व देयक तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. नोटाबंदी नंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी सोने व चांदीची चढय़ा भावाने मोठय़ा प्रमाणात विक्री झाल्याचा संशय आहे. गोपनीय खात्याने दिलेल्या अहवालानंतर या संशयावरूनच ही छापेमारी करून तपासणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्र शासनाने ८ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजता पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर काळा पैसा असलेल्यांची चांगलीच धांदल उडाल्याने त्यांनी सोन्याचे दागिने आणि सोन्याचे बिस्कीट मोठय़ा प्रमाणात खरेदी केल्याचा अहवाल गोपनीय खात्याने शासनाला सादर केला होता. देशातील सराफा व्यावसायिकांनी या संधीचा फायदा घेत तीन हजार रुपये भाव असलेले सोने तब्बल पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति एक ग्रॅम याप्रमाणे विक्री केले होते, तर बेहिशेबी पैसा बाळगणार्यांनी पैसा फे कल्यापेक्षा चढय़ा दराने का होईना, त्या दोन दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणात सोन्याची खरेदी केली होती. काळा पैसा पांढरा करण्यासाठी सोने खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता आयकर खात्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाकडून छापेमारी करण्यात येत आहे. आयकर खात्याच्या तीस अधिकार्यांचे पथकअकोल्यातील खंडेलवाल अलंकार केंद्र, विश्वकर्मा ज्वेलर्स आणि केजे स्क्वेअर या तीन सराफा प्रतिष्ठानांची झाडाझडती घेण्यासाठी नागपूर येथील तब्बल ३0 च्यावर अधिकार्यांचा समावेश असलेले पथक दाखल झाले आहे. या पथकाने बुधवारी सकाळी ११ वाजेपासूनच तीनही प्रतिष्ठानांची झडती घेतली असून, महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतल्याची माहिती पथकातील एका अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.तीन दिवस चालणार तपासणीनागपूर येथील आयकर खात्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाने (डायरेक्टर ऑफ इन्व्हेस्टिगेशन) बुधवारी सुरू केलेली तपासणी आणखी तीन दिवस चालणार असल्याची माहिती आहे. शहरातील तीन सराफा प्रतिष्ठानांची तपासणी बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी आणि शुक्रवारी आणखी काही प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.ज्वेलर्स बंद असताना छापेमारीबुधवारी ज्वेलर्स बंद ठेवण्यात येतात; मात्र आयकर खात्याने बुधवारीच छापेमारी करून दस्तावेज तपासणी सुरू केली आहे. येणारे दोन दिवस ही तपासणी सुरूच राहणार असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.आणखी सराफ रडारवरशहरासह जिल्हय़ातील आणखी काही सराफा प्रतिष्ठान आयकर खात्याच्या रडारवर आहेत. येणार्या दोन दिवसांमध्ये या सराफा प्रतिष्ठानांची झडती घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. अकोला शहरासह अकोट, मूर्तिजापूर येथीलही काही सराफा प्रतिष्ठानांची तपासणी होणार असल्याची माहिती आहे.
सराफा प्रतिष्ठानांवर आयकर छापे
By admin | Published: January 19, 2017 2:56 AM