लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय पालिकेचे कंत्राटदार, अशा तब्बल ३५ हून अधिक ठिकाणी छापे टाकल्यानंतर आता प्राप्तिकर विभागाने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित व्यक्तीकडे मोर्चा वळवला आहे. मंगळवारी सकाळपासून मुंबई आणि पुणे येथे १५ ठिकाणी छापे टाकण्यात आले.
युवासेनेचे पदाधिकारी, तसेच शिर्डी संस्थानचे विश्वस्त असलेले उद्योजक राहुल कनाल यांच्या वांद्रे येथील नाइन अल्मेडा इमारतीतील निवासस्थानी प्राप्तिकर विभागाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. कनाल हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा बंदोबस्त तैनात होता.
दुसरीकडे, अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आणि शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संघटक संजय कदम यांच्या निवासस्थानीही प्राप्तिकरने छापे टाकले. कदम हे केबल व्यावसायिक असून, ते अंधेरीतील कैलास नगरमध्ये असलेल्या ‘स्वान लेक’ या इमारतीतील १६ व्या मजल्यावर राहतात. पुण्यातील प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावरही प्राप्तिकर विभागाच्या पथकाने मंगळवारी छापा टाकला. या कारवाईदरम्यान, महत्त्वपूर्ण दस्तावेज प्राप्तिकर विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहेत, तसेच संबंधितांच्या विविध मालमत्तांवरदेखील सर्च ऑपरेशन सुरू आहे.
आधी यशवंत जाधव यांच्या घरीही छापेमारीn यापूर्वी प्राप्तिकर विभागाने यशवंत जाधव आणि त्यांच्याशी संबंधित निकटवर्तीयांच्या निवासस्थानी छापेमारी केली. n या कारवाईतून तब्बल १३० कोटी रुपये किमतीच्या ३६ स्थावर मालमत्तांचे तपशील आणि पालिका कंत्राटदारांनी तब्बल २०० कोटींचे उत्पन्न लपविल्याची माहिती समोर आली आहे.