मुंबई - लोकसभा निवडणुकीत मिळालेला मोठा विजय, मराठा आरक्षण मुद्दा आणि विरोधी पक्षातून सुरू असलेले पक्षांतर यामुळे भारतीय जनता पक्ष राज्यात पावरफुल झाला आहे. शिवसेनेकडून जन आशीर्वाद यात्रा काढल्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढण्याचे नियोजन केले आहे. आधीच भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षातील नेत्यांनी इनकमिंग सुरू आहे. त्यात आता मुख्यमंत्री महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. या कालावधीत विरोधी पक्ष पूर्ण तर रिकामा होणार नाही ना, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
भाजपाची महाजनादेश यात्रा १ ते ३१ ऑगस्टदरम्यान चालणार आहे. यादरम्यान मुख्यमंत्री राज्यातील विविध भागांना भेट देणार आहे. तसेच आपल्या सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती मुख्यमंत्री मतदारांना देणार आहेत. तसेच या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचीही भेट मुख्यमंत्री घेतील. या महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील सहभागी होणार आहेत.
या यात्रेदरम्यान भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना अनोख्या भेटी देण्याचं नियोजन करत आहेत. त्यानुसार अनेक जिल्ह्यांतील दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांची तयारी सुरू आहे. विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रवेशामुळे सहाजिकच भाजपची ताकत वाढणार आहे. किंबहुना मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा हा पण हेतू तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूणच मुख्यमंत्र्यांच्या यात्रेमुळे विरोधीपक्ष पूर्णच रिकामा होतो की, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
विजयाची खात्री नसल्याने नेत्यांचे पलायन
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील अनेक नेते सत्ताधारी भाजपमध्ये जाण्यास इच्छूक आहेत. अनेक नेत्यांनी पक्षांतर करून आपापले नियोजन लावले आहे. राज्यातील भाजपची वाढलेली ताकत आणि शिवसेनेसोबत असलेली युती यामुळे अनेक नेत्यांना विधानसभेला तिकीट मिळाले तरी विजयाची शाश्वती नाही. तर काहींना मंत्रीपदाची आस लागली आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेते पलायन करण्याच्या तयारीत आहेत.