प्रताप नलावडे - बीड
स्थानिक मुद्दे आणि महिलांसाठी केलेली कामे घेऊन केज मतदारसंघात प्रमुख पक्षाच्या चारही महिला उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. राष्ट्रवादीच्या दिवंगत नेत्या विमल मुंदडा यांचे सातत्याने वर्चस्व राहिलेल्या या मतदारसंघात पुन्हा महिला नेतृत्वालाच संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनुसुचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव असलेल्या केज मतदारसंघावर पंचवीस वर्षे विमल मुंदडा यांचे वर्चस्व राहिले. त्यांच्या अकाली निधनानंतर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे विजयी झाले. यावेळी मात्र राष्ट्रवादीने साठे यांना उमेदवारी नाकारत तरूण महिलेला संधी दिली आहे.
राष्ट्रवादीकडून मुंदडा यांच्या स्नुषा नमिता मुंदडा, काँग्रेसकडून डॉ. अंजली घाडगे, भाजपाकडून प्रा. संगीता ठोंबरे आणि शिवसेनेकडून कल्पना नरहिरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.