मुंबई : राज्यात २०१३ च्या ९३७ सायबर गुन्ह्यांच्या तुलनेत २०१४ सालात वाढ झाली असून एकूण २६२९ गुन्ह्णांची नोंद झाली. मात्र त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नसल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. त्यामुळे राज्यातील एक हजार पोलीस कर्मचारी- अधिकाऱ्यांना ‘नॅसकॉम’च्या मदतीने सायबर प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. भाजपाचे विजय (भाई) गिरकर यांनी राज्यातील वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, २०१३ मध्ये राज्यात केवळ ९३७ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०१४ मध्ये मात्र त्यात मोठी वाढ झाली असून राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये तब्बल २ हजार ६९६ गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र राज्यात आजपर्यंत सायबर गुन्ह्याखाली नोंदवण्यात आलेला एकही गुन्हा सिद्ध झालेला नाही.सोशल नेटवर्किंगवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास लावण्यात येणारे कलम ६६ अ कलम सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच रद्द केले आहे. केंद्र सरकार यासंदर्भात नवीन कायदा करत असून राज्याला याप्रकरणी नवा कायदा करण्याची गरज नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला.(प्रतिनिधी)
सायबर गुन्ह्यांत वाढ, मात्र एकही आरोप सिद्ध नाही !
By admin | Published: April 02, 2015 2:59 AM